मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश तुलसियानी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे डीआयजी श्रीकांत किशोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सीआयएसएफच्या पथकाने या वेळी संचलन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. देशभक्तीपर गाण्यांवर तालबद्ध नृत्य करून शहीद जवानांना अनोख्या प्रकारची मानवंदना देण्यात आली. त्याशिवाय भारतीय संस्कृतीची विविधता दर्शविणारे नृत्यप्रकारही सादर करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांना वृक्ष भेट देण्यात आले.
.........
जुहू विमानतळावर कोरोनाबाबतचे नियम पाळून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष जे.टी. राधाकृष्ण आणि जुहू विमानतळाचे संचालक अशोक कुमार वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाकाळात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आणि कोविड योद्ध्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.