स्वातंत्र्यदिनी मिळणार गरजू विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षणाचे स्वातंत्र्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 06:30 PM2020-08-14T18:30:32+5:302020-08-14T18:30:57+5:30

अमेरिकास्थित माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मोबाईल फोन, टॅबची मदत 

On Independence Day, needy students will get the freedom of digital education | स्वातंत्र्यदिनी मिळणार गरजू विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षणाचे स्वातंत्र्य 

स्वातंत्र्यदिनी मिळणार गरजू विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षणाचे स्वातंत्र्य 

Next

मुंबई : कोरोना संकट काळात टॅब , मोबाईल फोन या डिजिटल वस्तू आज विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शैक्षणिक गरजेसाठी आवश्यक झाले आहेत. ते न मिळाल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून दूर होत आहेत. मात्र आपल्या शाळेतील अशा विद्यार्थ्यांसाठी अमेरिकनस्थित माजी विद्यार्थी पुढे आले आणि त्यांनी  मदत केली आहे. सुरुवातीपासूनच पहिलीपासून दहावीपर्यंत ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग प्रभावीपणे राबवणा-या सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये शनिवार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर धारावी, सायन, कुर्ला परिसरातल्या गरजू कुटुंबांतील ६० विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन तसेच टॅब दिले जाणार आहेत. 

एप्रिलाच्या पहिल्या आठवड्यापासूनच सायनस्थित डी. एस. हायस्कूलने सर्व इयत्तांसाठी डिजिटल वर्ग सुरू केले. या उपक्रमाला विद्यार्थी-पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला खरा, मात्र कष्टकरी वर्गातील काही पालक आपल्या पाल्यांना मोबाईल फोन उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. "करोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. दुर्दैवाने आपल्या राज्यातील सुमारे ६० टक्के कुटुंबांकडे आजही स्मार्टफोन नाहीत. आमच्या शाळेतील ३५ टक्के विद्यार्थ्यांकडे डिजिटल शिक्षणासाठी कोणतंही साधन उपलब्ध नाही. हे सर्व विद्यार्थी धारावी, प्रतिक्षा नगर, कुर्ला इथल्या कष्टकरी वस्त्यांमध्ये राहतात. पाच-सात हजारांचा स्मार्टफोन विकत घेणेही त्यांच्या पालकांना शक्य नाही", अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधानी यांनी दिली. अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये तसंच ऑनलाईन वर्गांपासून ते वंचित राहू नयेत, यासाठी 'स्मार्ट मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅबलेट् किंवा कॉम्प्युटर दान करा' असं आवाहन शाळेने केले होते.

शाळेने केलेल्या या आवाहनाला समाधान कारक प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्यात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ३५ स्मार्टफोन, चार टॅब आणि दोन लॅपटॉप उपलब्ध झाले. तर, दुस-या आठवड्यात सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले शाळेचे माजी रोहित मांडगे यांनी २० नवे कोरे टॅब शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाठवले आहेत. या मदतीमुळे शाळेतील ६० विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वत:च्या हक्काचे साधन उपलब्ध झाले आहे. शाळेला आणखी किमान ३०० स्मार्टफोन किंवा टॅबची गरज आहे" अशी महिती प्रधान यांनी दिली.  विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना आर्थिक मंदीमुळे शाळेची शैक्षणिक फी भरणे शक्य होणार नाही, अशा गरजू पालकांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी डी. एस. हायस्कूलचे अमेरिकास्थित काही माजी विद्यार्थी शाळेला आर्थिक निधी उभारण्यासाठी सहकार्य करत आहेतअसेही त्यांनी सांगितले. 

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, टॅब गरज झाली आहे. ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही, त्याला शिक्षणाचे स्वातंत्र्य हे वास्तव झाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आम्ही शाळेत ६० विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-टॅब देऊन डिजिटल शैक्षणिक हक्काच्या दिशेने एक पाऊल टाकत आहोत
- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष- डी. एस. हायस्कूल.

Web Title: On Independence Day, needy students will get the freedom of digital education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.