Join us

सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिन, दहीहंडी फिव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:30 AM

हल्ली मुंबईकरांना ‘सोशल’ होण्यासाठी कोणतेच निमित्त लागत नाही.

मुंबई : हल्ली मुंबईकरांना ‘सोशल’ होण्यासाठी कोणतेच निमित्त लागत नाही. मात्र निमित्त असले की त्याचे पुरेपूर प्रतिबिंब सोशल मीडियावर दिसून येते. याचीच प्रचिती मंगळवारी आली. स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकत्र आल्याने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर या सोशल साइट्सवर सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वेगळाच फिव्हर दिसून आला.स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे अनेक संदेश आणि छायाचित्रे सोशल मीडियावर शेअरिंग होताना दिसून आली. याशिवाय, राष्ट्रध्वजाच्या रंगात आपला प्रोफाइल फोटो अपडेट करण्यालाही नेटिझन्सनी अधिक पसंती दर्शविली. बºयाच ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याचे लाइव्ह आणि फोटो अपलोड होताना दिसून आले. मंगळवारी दिवसभर बरीच देशभक्तीपर गाणी आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर झाल्या.मुंबई शहर-उपनगरात सोमवारी रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा पार पडला. यानिमित्ताने फेसबुकवर श्रीकृष्ण जन्माचे बरेच ‘लाइव्ह’ सोहळे दिसून आले. याशिवाय, नेटिझन्सने उत्साहाच्या भरात दहीहंडीच्या थरांचेही ‘लाइव्ह’ केल्याने याची वेगळीच मजा अनुभवण्यास मिळाली. यात गोपिकांचाही पुढाकार असल्याचे दिसून आले. डोक्याला ‘बजरंग बली की जय...’ची पट्टी बांधून कंबरेला ओढणी बांधून दहीहंडीचे टी-शर्ट्स घातलेल्या गोपिकांनीही आपले प्रोफाइल फोटोज् अपडेट्स केलेले दिसून आले. त्याचप्रमाणे, घराघरांतील लहानग्या मंडळीचे बाळकृष्णाच्या पेहरावातील फोटोंनी लाइक्स मिळविले.