लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
राज्यात अनेक भागांत नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत, मात्र इतर इयत्तांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन हा शाळांमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन स्वरूपात आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शिक्षक मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रम आणि स्पर्धांचे व्हिडिओ, फोटो #स्वातंत्र्यदिन२०२१ व #indipendencedayindia2021 या हॅशटॅगसहित फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा विविध समाजमाध्यमांवर अपलोड करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. प्रत्येक गटात वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना आपल्या देशभक्तीचे प्रदर्शन आणि स्वातंत्र्यदिन शाळेच्या पटांगणाऐवजी ऑनलाईन पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन
स्वातंत्र्यासाठी दिल्या गेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी अशा विविध उद्देशांनी राज्यातील पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी दिवसभरात वृक्षारोपण, आंतरशालेय महाविद्यालय / शाळा स्तरावर वादविवाद, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, निबंध, कविता, चित्रकला, देशभक्तीपर गीतगायन असे विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
मुंबईच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करायचे की नाही?
राज्याच्या अनेक जिल्ह्यांत शाळांमध्ये हजर राहून ध्वजारोहण करावे आणि विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, उपक्रम ऑनलाईन घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत. मात्र मुंबईतील शाळांसदर्भात अद्याप काहीच सूचना न दिल्याने शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. मुंबई महानगर पालिका क्षेत्रात जसे शिष्यवृत्ती परीक्षा होणार नाही हे एक दिवस आधी जाहीर केले तसे याबाबतचा निर्णयही कधी जाहीर करणार असा प्रश्न शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे. मोजक्या शिक्षकांसह शाळांमध्ये ध्वजारोहणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.