ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र गाड्यांची गरज
By admin | Published: January 1, 2016 01:44 AM2016-01-01T01:44:46+5:302016-01-01T01:44:46+5:30
ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तीन लाख घरांना कचऱ्याचे डबे देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ मात्र, ओला आणि सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने पालिकेकडे
मुंबई : ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तीन लाख घरांना कचऱ्याचे डबे देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ मात्र, ओला आणि सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने पालिकेकडे नसल्यामुळे, साडेचार कोटींचा हा प्रकल्प ‘कचऱ्यात’च जाण्याची चिन्हे आहेत़
ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प अनेक वर्षे मुंबईत सुरूआहे़, पण या प्रकल्पाला यश आलेले नाही़ त्यामुळे पालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मुंबईकरांना स्वतंत्र डबे देण्याचा निर्णय घेतला़ मात्र, घराघरांत या कचऱ्याचे वर्गीकरण झाले, तरी पालिकेकडे मात्र या कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने नसल्याने, ओला व सुका कचरा एकत्रच डम्पिंग ग्राउंडवर जाण्याची भीती भाजपाचे विनोद शेलार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केली़ सप्टेंबरमध्येच पालिकेने कचऱ्याचे ४३०० डबे खरेदी केले होते. तत्पूर्वी, आॅगस्ट २०१४ मध्ये तीन कोटी ४० लाख रुपये डब्यांसाठी खर्च करण्यात आले होते़ एवढा पैसा ओतल्यानंतरही मुंबईतील कचराकुंड्यांची दुरवस्था कायम आहे़ कचऱ्याचे नवीन डबे आठ दिवसांत तुटल्याचे दिसून आल्याची नाराजी राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी व्यक्त केली़ मात्र, पहिल्या वर्षभरात तुटलेले डबे ठेकेदार स्वखर्चाने पुन्हा पुरवणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले़
कचरा डम्पिंग ग्राउंडवर वेगळा जमा झाल्यास, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया आणि सुका कचऱ्याची स्वतंत्र विल्हेवाट लावणे शक्य होईल. यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा भार कमी होण्यास मदत होईल़
स्वखर्चाने पालिका पुरविणार डबे
२००६ पासून सुका व ओला कचरा वेगळा करणे पालिकेने बंधनकारक केले़ यातील कलम ३६८ अनुसार सुका व ओला कचऱ्यासाठी वेगळे डबे ठेवण्याची जबाबदारी घरमालक अथवा भाडेकरूची आहे़ मुंबईत सुका कचरा उचलणारी ४६ वाहने व ३६ केंद्र आहेत़ या सक्तीची मुंबईकर दखल घेत नसल्यामुळे, अखेर पालिकेने स्वखर्चाने कचऱ्याचे डबे मुंबईकरांना देण्याचा निर्णय घेतला आहे़