रिपाइंच्या अपक्ष उमेदवारांना स्वीकृत नगरसेवकाचे स्वप्न
By admin | Published: February 14, 2017 04:39 AM2017-02-14T04:39:01+5:302017-02-14T04:39:01+5:30
अपक्ष उभे असलेल्या रिपाइंच्या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी चक्क त्यांना स्वीकृत नगरसेवकाचे गाजर दाखविण्यात येत आहे.
मुंबई : अपक्ष उभे असलेल्या रिपाइंच्या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी चक्क त्यांना स्वीकृत नगरसेवकाचे गाजर दाखविण्यात येत आहे. तेही त्यांच्या जाळ्यात येत मागे हटत असल्याचे चित्र मुलुंडमध्ये पाहावयास मिळत आहे.
भाजपासोबत युती असतानाही हव्या त्या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने रिपाइंच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले. मुलुंडमध्ये १०८ आणि १०७मधून रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते. यापैकी प्रभाग क्रमांक १०८मधील झोपडपट्टी विभागात रिपाइं उमेदवाराचे वर्चस्व अधिक होते. मात्र याच भागात तब्बल १७ अपक्ष रिंगणात उतरले आहेत. त्यात खासदाराच्या मुलाला पाडण्यासाठी अंतर्गत तयारी सुरू आहे.
या उमेदवाराला काँग्रेस उमेदवाराने स्वीकृत नगरसेवकाचे गाजर दाखविल्याने त्याने माघार घेतली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत माघार घेत असल्याचे सांगून काँग्रेस उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यात अन्य रिपाइंचे उमेदवारही माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातही हेच चित्र असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)