Join us

मुंबईसाठी स्वतंत्र शहर आपत्ती व्यवस्थापन पथक

By admin | Published: March 15, 2017 2:57 AM

आपत्तीकाळात मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकावर (एनडीआरएफ) अवलंबून असणाऱ्या मुंबईला लवकरच एक स्वतंत्र कुमक मिळणार आहे

मुंबई : आपत्तीकाळात मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकावर (एनडीआरएफ) अवलंबून असणाऱ्या मुंबईला लवकरच एक स्वतंत्र कुमक मिळणार आहे. भूकंप, पूर, इमारत कोसळणे अशा आपत्तीकाळात हे पथकच मदतीसाठी धावून येणार आहे. यामुळे सुरुवातीच्या गोल्डन अवर्समध्येच शहर आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत मदतकार्य पोहोचवून जीवितहानी रोखणे शक्य होणार आहे. संपूर्ण देशात शहरासाठी विशेष पथक असलेले मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे.आपत्तीकाळात मदतीसाठी एनडीआरएफची स्थापना झाली. या पथकाला पावसाळ्यात पाचारण करण्यात येते. मात्र त्यानंतर कोणतीही आपत्ती ओढवल्यास हे पथक मुंबईत पोहोचेपर्यंत विलंब होतो. परिणामी जीवित व वित्तहानी वाढते. भौगोलिक परिस्थिती आणि मर्यादा लक्षात घेत ‘एनडीआरएफ’चे जवान प्रत्येक आपत्तीच्या वेळी तत्काळ पोहोचण्यावरही मर्यादा आहेत. शहराची लोकसंख्या आणि संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन नुकतीच मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)असे असेल पथकपालिकेच्या सुरक्षा दलात गेल्या वर्षी भरती झालेल्या दोनशे जवानांचा या पथकामध्ये समावेश करण्यात येणार आहे. या सर्व जवानांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘एनडीआरएफ’द्वारे तसेच भारतीय सैन्य दलाद्वारे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये रासायनिक, जैविक, अणू नैसर्गिक व आण्विक आपत्ती, वैद्यकीय प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण, कोसळलेल्या बांधकामात अडकलेल्या लोकांची सुटका करणे, पुराच्या पाण्यातून लोकांना वाचविणे, उंच इमारतींमधील आपत्तीप्रसंगी लोकांचा बचाव करणे याचा समावेश असणार आहे.भूकंप, पूर, इमारत कोसळणे यासारख्या आपत्तीच्या वेळी धावून येत अनेकांचे जीव वाचवणारे ‘एनडीआरएफ’चे जवान म्हणजे अनेकांसाठी देवदूतच. मात्र, भौगोलिक परिस्थिती आणि मर्यादा लक्षात घेत ‘एनडीआरएफ’चे जवान प्रत्येक आपत्तीच्या वेळी तत्काळ पोहोचण्यावरही मर्यादा येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, तसेच मुंबई शहराची लोकसंख्या आणि आपत्ती संभाव्यता लक्षात घेता, मुंबई महानगरासाठी स्वत:चे आपत्ती व्यवस्थापन पथक उभारण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.सध्या केंद्र शासनाच्या स्तरावर ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक’ (एनडीआरएफ) कार्यरत आहे. आता याच ‘एनडीआरएफ’च्या धर्तीवर खास मुंबईसाठी ‘शहर आपत्ती व्यवस्थापन पथक’ स्थापन करण्यात येणार असल्याने स्वत:चे आपत्ती व्यवस्थापन पथक असणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.‘शहर आपत्ती व्यवस्थापन पथक’ हे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) यांच्या अखत्यारीत असणार आहे. शांततेच्या काळात या पथकातील प्रशिक्षित कर्मचारी हे महापालिकेच्या प्रमुख सुरक्षा अधिकारी यांच्या अखत्यारीत कार्यरत असतील. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या कर्मचाऱ्यांचा ताबा हा लगेचच महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख अधिकाऱ्याकडे वर्ग होणार आहे.शहर आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान हे शांततेच्या काळात महापालिकेच्या सुरक्षा खात्याचा गणवेश परिधान करतील, तर आपत्कालीन परिस्थितीच्या काळात ‘सीडीआरएफ’साठी असलेला वैशिष्ट्यपूर्ण गणवेश परिधान करतील. विशेष म्हणजे प्रस्तावित शहर आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये कार्यरत असणारे २०० जवान हे महापालिकेच्या सुरक्षा खात्याचेच कर्मचारी आहेत.स्वतंत्र पथकाची स्थापनामुंबई शहर हे अनेक प्रकारच्या आपत्तींसाठी संवेदनशील मानले जाते. यासाठी १९९९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षाने विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. हा कक्ष आता अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने आणि कोणत्याही आपत्तीदरम्यान तत्काळ व गुणवत्तापूर्ण आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ‘शहर आपत्ती व्यवस्थापन पथक’ अर्थात ‘सीडीआरएफ’ची स्थापना करण्यात येणार आहे.जवान वेळेत पोहोचतीलआपत्कालीन व्यवस्थापनासाठी असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण या जवानांना दिले जाणार आहे. या जवानांची महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागवार नेमणूक करण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यातील संभाव्य आपत्तीच्या वेळी हे जवान आपत्कालीन परिस्थितीच्या ठिकाणी तत्काळ पोहोचतील.