मुंबई : ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी समाजातर्फे केली जात असताना आता ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील सर्व जातींच्या कल्याणसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू झाल्या आहेत.मराठा आरक्षणामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमधील टक्का कमी झाल्याने खुल्या प्रवर्गात सध्या अस्वस्थता आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या जिल्ह्याजिल्ह्यात ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ हे आंदोलन सुरु करण्यात आले असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी निघत असलेल्या मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, खुल्या प्रवर्गातील समाजांकरता महामंडळ स्थापन करून रोष कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. ओबीसी मंत्रालयांतर्गतच हे महामंडळ कार्यरत असेल पण त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून एमबीबीएसच्या जागा राज्य शासनाने वाढवून घेतल्या. त्याच धर्तीवर एलएलएमच्या (विधी पदव्युत्तर) जागा वाढवून घेण्याची मागणी आता जोर धरत आहे. विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रेटली आहे.
ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गांसाठी लवकरच स्वतंत्र महामंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:19 AM