मुंबई : मुंबई ही देशाची केवळ आर्थिक राजधानीच नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानीदेखील आहे. अभिजात तसेच लोकप्रिय संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांची मुंबई ही कर्मभूमी आहे. या पाश्वर्भूमीवर मुंबई येथे एक स्वतंत्र ‘सांस्कृतिक परिसर’ निर्माण करून देश-विदेशातील कलाकारांकरिता एक मोठे व्यासपीठ निर्माण करणे औचित्याचे ठरेल, असे मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी येथे व्यक्त केले.अशा प्रकारचा सांस्कृतिक परिसर सर्वसमावेशक असावा तसेच तेथे सर्व कलाकार व रसिकांना नि:शुल्क प्रवेश असावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. ज्येष्ठ संतूरवादक पं़ शिवकुमार शर्मा यांना शनिवारी (दि.७) राज्यपालांच्या हस्ते आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. भारतरत्न लता मंगेशकर, पं़ भीमसेन जोशी, पं़ रामनारायण, पं़ बिरजू महाराज यांना यापूर्वी कला शिखर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.मुंबईत विलेपार्ले, माटुंगा, डोंबिवली व इतर ठिकाणी संगीत कट्टे आहेत. अशा प्रकारच्या संगीताला चालना देणाऱ्या संस्था बळकट केल्या पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच संगीत-कला साधनेसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी हॉस्टेल्स निर्माण केली पाहिजेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी युवा सारंगीवादक मुराद अली खान व तबलावादक सत्यजित तळवलकर यांना कलाकिरण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहनाई वादक संजीव आणि अश्विनी शंकर यांना स्पेशल ज्युरी पुरस्कार देण्यात आला. बिर्ला समूहाच्या प्रमुख राजश्री बिर्ला यांनी प्रास्ताविक केले, तर पं़ शिवकुमार शर्मा यांनी सत्काराला उत्तर दिले. संगीत कला केंद्राचे मानद सचिव ललित डागा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वतंत्र ‘सांस्कृतिक परिसर’ हवा
By admin | Published: November 09, 2015 2:54 AM