मुंबईसाठी स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद पथक

By admin | Published: August 16, 2016 01:48 AM2016-08-16T01:48:00+5:302016-08-16T01:48:00+5:30

मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारती कोसळण्याचा धोका वाढला आहे़ दक्षिण मुंबईत अशा काही घटना गेल्या दोन आठवड्यांत घडल्या़ तसेच भिवंडीमध्येही दोन इमारती

Independent Disaster Response Team for Mumbai | मुंबईसाठी स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद पथक

मुंबईसाठी स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद पथक

Next

मुंबई : मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारती कोसळण्याचा धोका वाढला आहे़ दक्षिण मुंबईत अशा काही घटना गेल्या दोन आठवड्यांत घडल्या़ तसेच भिवंडीमध्येही दोन इमारती कोसळून निष्पाप जीव बळी गेल्याच्या घटना ताज्या आहेत़ या दुर्घटनांतून वेळीच शहाणपण घेत महापालिका प्रशासनाने शहर आपत्ती प्रतिसाद पथक स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे़
२००५मध्ये मुंबईवर ओढावलेल्या पूरपरिस्थितीनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) दरवर्षी पावसाळ्यात पाचारण केले जाऊ लागले़ या पथकाची व्यवस्था कायमस्वरूपी मुंबईत करण्यासाठी अंधेरी येथील क्रीडा संकुलात त्यांची व्यवस्था करण्यात आली़ त्याप्रमाणे मुंबईकडे आज एनडीआरएफचे तीन पथके आहेत़ या पथकात एकूण ४५ जवान आहेत़ मात्र हे पथक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी असल्याने शहरासाठी स्वतंत्र पथक असल्याची गरज भासू लागली आहे़
त्यानुसार एनडीआरएफच्या धर्तीवर शहरासाठी आपत्ती प्रतिसाद पथक स्थापन करण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे़ या पथकामध्ये पाचशे जवान व अधिकाऱ्यांचा समावेश असेल़ ज्यांना पुरातील मदतकार्य, इमारत व दरड कोसळणे आणि इतर मदतकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ एनडीआरएफकडूनच याबाबत मार्गदर्शन घेतले जाणार असून, त्यानुसार सहा महिन्यांत असे पथक मुंबईसाठी तयार ठेवण्याचे पालिकेचे लक्ष्य असल्याचे सूत्रांकडून
समजते़.

असे असेल प्रशिक्षण
एनडीआरएफ पथकाच्या मदतीनेच आपत्ती प्रतिसाद पथक तयार केले जाणार आहे़ यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल़ पूर, इमारत व दरड कोसळणे तसेच अन्य प्रकारच्या आपत्ती काळातील मदतकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ (प्रतिनिधी)

स्वतंत्र पथकाची यासाठी गरज : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक मुंबईत असले तरी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश, पुणे व आसपासच्या शहरांतही या पथकाची मदत आपत्ती काळात घेतली जाते़ त्यामुळे एकाचवेळी दोन ठिकाणी आपत्ती ओढावल्यास या पथकावर विसंबून राहणे मुंबईसाठी धोकादायक ठरेल, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले़

७४० इमारती धोकादायक
पावसाळ्यापूर्व सर्वेक्षणात मुंबईत ७४० इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते़ २०१५मध्ये हा आकडा ५४५ होता़
शहरात १४६, पश्चिम उपनगरात ३०८ आणि पूर्व उपनगरात २८६ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत़

इमारत दुर्घटना...
३१ जुलै २०१६
भिवंडीमध्ये शांती नगर येथे तीन मजली इमारत कोळसून आठ जण मृत्युमुखी आणि २६ जखमी
एप्रिल २०१६
कामाठीपुरा येथे निमकर मार्गावर तीन मजली इमारत कोसळून सहा मृत्युमुखी आणि दोन जखमी़
आॅगस्ट २०१६
गिरगावमध्ये पाठारे हाउस या इमारतीचा स्लॅब कोसळला़ तर खत्तरगल्लीतील इमारतीचा भाग कोसळला़ यामध्ये अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले़ यामुळे अनर्थ टळला़

Web Title: Independent Disaster Response Team for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.