“४ दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील”; देवेंद्र भुयार यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:37 PM2022-06-23T17:37:42+5:302022-06-23T17:39:22+5:30
गुवाहाटीहून मलाही फोन आले. मोठ्या ऑफर देण्यात आल्या, असा दावा देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्रथम शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, यावर शिंदे गट ठाम आहे. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातच महाविकास आघाडीसोबत असलेले अपक्षा आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना मोठा दावा केला आहे. चार दिवस थांबा. बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील, असे भुयार यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची काही मते फुटली होती. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अपक्षांवर आरोप केले. यामध्ये देवेंद्र भुयार यांचे नाव होते. यानंतर ते प्रकाशझोतात आले. यानंतर देवेंद्र भुयार यांनी आपली बाजू आणि भूमिका स्पष्ट केली. तसेच संजय राऊत यांची भेटही घेतली होती. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांनी एक बैठक मुंबईत झाली. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीला देवेंद्र भुयार यांनी हजेरी लावली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील
महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही. भक्कम आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. येत्या दोन ते चार दिवसांत सगळे चित्र स्पष्ट होईल. गुवाहाटीला गेलेल्या काही अपक्ष आमदारांचे मलाही फोन आले. अनेक आमिषे, ऑफर देण्यात आल्या. मात्र, मी महाविकास आघाडीसोबतच आहे, असे भुयार यांनी स्पष्ट केले. तसेच ही बंडखोरी अधिक दिवस टिकणारी नाही. थोडे थांबा पुढील चार दिवसांत बंडखोर आमदार येऊन मातोश्रीवर पाय धरतील, असा दावा भुयार यांनी केला. यावेळी भाजपवर टीका करताना, हे सर्व भाजप घडवून आणत असून, यासाठी ईडीची भीती दाखवण्यात येत आहे. ईडीच्या कारवायांमुळे नेते त्रस्त आहेत, असा हल्लाबोल भुयार यांनी केला.
दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला २४ तासांचे अल्टिमेटम दिला असून, मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाविकास आघाडीतून प्रथम बाहेर पडा, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे.