अपक्ष आमदार गीता जैन यांचा आज शिवसेनेत प्रवेश मातोश्रीवर होणार कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 09:24 AM2020-10-24T09:24:21+5:302020-10-24T09:25:10+5:30
जैन या महापौर असताना त्यांचे कामकाज व वादग्रस्त मुद्दे यावरून माजी आमदार नरेंद्र मेहतांशी बिनसले. त्यानंतर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे मेहता यांच्याच पारड्यात गेल्या वर्षी उमेदवारीची माळ पडली.
मीरा रोड : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या उद्या दुपारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन स्वागत करतील.
जैन या महापौर असताना त्यांचे कामकाज व वादग्रस्त मुद्दे यावरून माजी आमदार नरेंद्र मेहतांशी बिनसले. त्यानंतर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे मेहता यांच्याच पारड्यात गेल्या वर्षी उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे जैन यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले होते. परंतु, मेहतांबद्दल असलेल्या नाराजीमुळे नागरिकांनी मेहतांना पराभवाची धूळ चारून जैन यांना विजयी केले. राज्यात भाजपने सरकार बनवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आणि जैन यांना पुन्हा पक्षासोबत येण्याचा आग्रह धरला.
दुसरीकडे शिवसेनेकडून त्यांना आमदार झाल्यापासूनच सेनेत प्रवेशासह राज्यमंत्रीपद देण्याची आॅफर आली होती. परंतु, त्या वेळी त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मीरा-भार्इ$ंदर भाजपची जबाबदारी देण्याचा आग्रह त्यांनी केला होता. परंतु, प्रत्यक्षात जैन यांना डावलल्याने त्या नाराज होत्या.
स्वत: मुख्यमंत्री होते आग्रही पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे जैन यांच्या सेनाप्रवेशासाठी प्रयत्नशील होते. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही जैन यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर, जैन यांनी उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
जैन समाजाच्या आमदार असल्याने राज्यातील जैन समाजाच्या मोठया संख्येने असलेल्या मतदारांमध्येही शिवसेनेबाबत चांगला संदेश जाईल, असे सेनेतील एका नेत्याने सांगितले.