Join us  

अति करणाऱ्या लोकांची माती होते, शिवसेना भवनही एकनाथ शिंदेंनाच मिळणार; नवनीत राणांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 2:31 PM

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई- पक्षाचे नाव आणि चिन्ह यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शुक्रवारी झाला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला.

यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वातील 'बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष व त्यांचे ढाल- तलवार हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष व त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह यांची मुदत केवळ चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अति करणाऱ्या लोकांची माती होते. आता माती खाणाऱ्या लोकांचे दिवस आलेत. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बुडवली, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच अजुनही वेळ गेलेली नाही. जर उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारणा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे, असं नवनीत राणा म्हणाल्या. येत्या काळात शिवसेना भवन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार असून महाशिवरात्रीचा प्रसाद महादेवाने उध्दव ठाकरे यांना चांगलाच दिला आहे, असा टोलाही नवनीत राणांनी लगावला आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय घातक-

निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. 

रामाकडे धनुष्यबाण होता-

रामाकडे धनुष्यबाण होता आणि रावणाकडेही धनुष्यबाण होता. पण सत्याचाच विजय होणार. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंध धृतराष्ट्र नाही. हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, तिथे निकाल आमच्या बाजूने लागेल. धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिकडं जल्लोष सुरू असेल. आपली चोरी पचली म्हणून चोर जल्लोष करत असतील. पण चोरी ही चोरीच असते. आम्ही लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार, तोपर्यंत यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनी खचू नका, मी खचलो नाहीये. ही लढाई शेवटपर्यंत आपल्याला लढावी लागेल. हिम्मत सोडू नका, विजय आपलाच होणार. मैदानात उतरलो आहोत, विजयाशिवाय परत यायचे नाही. यांनाना शिवसेनाप्रमुखांचा फोटो, नाव चोरावे लागत आहे. हे नामर्दांनो जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेनवनीत कौर राणाशिवसेना