मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाईल. तोपर्यंत या २७ गावांत सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ शिंदे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी या निर्णयाची अधिसूचना काढल्यानंतर वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी त्याचप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीमुळे काही काळ ही प्रक्रियाथांबवल्यामुळे ही नगर परिषद स्थापन करायला विलंब झाला, असे सांगितले. यासाठी विभागीय आयुक्तांकडे २५ हजारांवर हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. त्यावर लवकरच विचार करण्यात येईल. त्यानंतर विभागीय आयुक्तांसह कोकण विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकारी पातळीवरून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.>शिवसेनेचा सवालकल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याच्या निर्णयामागे फक्त राजकीय उद्देश होता, असा आरोप शिवसेना गटनेते अनिल परब यांनी केला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान २७ गावांच्या समावेशावरून शिवसेना आणि भाजपात चांगलीच जुंपली होती. त्याचेच पडसाद पाहायला मिळाले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या गावांना किती निधी मिळाला, असा थेट प्रश्न करत भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.कायदे धाब्यावर बसवून ही नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. या गावांतील नागरिकांकडून करवसुली केली जाते; मात्र त्यांना सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी केला. प्रक्रिया विलंबाने सुरू असल्याबद्दल विभागीय आयुक्तांवर कारवाईची मागणी जयंत पाटील यांनी केली.
‘कडोंमपा’तील २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:53 AM