Join us

‘स्वमग्न’ मुलांसाठी स्वतंत्र कक्ष

By admin | Published: January 14, 2017 7:14 AM

आत्मकेंद्री पद्धतीने स्वत:च्या जगात हरवून जाणाऱ्या ‘स्वमग्न’ मुलांवर प्रभावी उपचार करण्यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने

मुंबई : आत्मकेंद्री पद्धतीने स्वत:च्या जगात हरवून जाणाऱ्या ‘स्वमग्न’ मुलांवर प्रभावी उपचार करण्यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने नुकताच एक विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. धारावी परिसरातील ६० फुटी रस्त्यावर असणाऱ्या व ‘छोटा सायन रुग्णालय’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागरी आरोग्य केंद्राच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना बालरोग चिकित्सा विभागातील प्राध्यापिका आणि न्युरो डेव्हलपमेंटल सेंटरच्या प्रमुख डॉ. मोना गजरे यांनी सांगितले की, स्वमग्न मुलांवर सुयोग्य उपचार केल्यास ते आत्मविश्वासासह अधिक चांगल्या पद्धतीने समाजात वावरू शकतात. भारतात सामान्यपणे दर हजार मुलांमागे ४ मुले स्वमग्न असल्याचे आढळून येते. एखादा मुलगा स्वमग्न असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार नियमित व सुयोग्य औषधोपचार करणे गरजेचे असते. हे औषधोपचार बालरोगचिकित्सा, मनोविकारचिकित्सा आणि आॅक्युपेशनल थेरपी यांच्या माध्यमातून संयुक्तपणे करणे आवश्यक असते. तसेच हे उपचार करताना त्या मुलांना अनुरूप असे वातावरण असल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने धारावी परिसरात स्वमग्न मुलांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.धारावी येथील स्वमग्न मुलांसाठीच्या विशेष कक्षात एकावेळी ४० मुलांवर उपचार करणे शक्य असणार आहे. या कक्षामध्ये २ ते १६ वर्षे या वयोगटातील स्वमग्न मुलांवरील उपचारांच्या अनुषंगाने विविध अत्याधुनिक सामग्री व खेळणी आहे. या कक्षात एका सत्राच्या उपचारासाठी अल्प दर आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या मुलांना आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे. तसेच आत्यंतिक गरजू पार्श्वभूमी असलेल्या मुलांसाठी समाज विकास अधिकाऱ्यांमार्फत मदत देण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.सध्या या केंद्रात २० स्वमग्न मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. बालरोगचिकित्सा विभागातील प्रा. डॉ. ममता मंगलानी व डॉ. मोना गजरे, आॅक्युपेशनल थेरपी विभागातील प्रा. डॉ. रश्मी ऐराडकर व डॉ. सुशांत सारंग आणि मनोरुग्णविकार विभागातील प्रा. डॉ. नीलेश शहा व डॉ. सागर कारिया यांच्या मार्गदर्शनात स्वमग्न मुलांवर येथे उपचार केले जाणार आहेत.या केंद्रात उपचार करण्यासाठी स्वमग्न मुलांची नोंदणी करावयाची झाल्यास; त्यांना प्रथम महापालिकेच्या शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत करता येणार आहे.येथे प्राथमिक तपासणी झाल्यानंतरच संबंधित मुलांना धारावी परिसरातील ‘छोटा सायन’ रुग्णालयात आवश्यकतेनुसार संदर्भित केले जाणार आहे, अशीही माहिती डॉ. मोना गजरे यांनी दिली आहे. या सोयीमुळे शहरातील तसेच शहराबाहेरील स्वमग्न मुलांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.