Join us

‘बेस्ट’ला स्वतंत्र मार्गिका

By admin | Published: July 11, 2015 2:38 AM

वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढताना नाकीनऊ येत असलेल्या बेस्ट उपक्रमाचे स्वतंत्र मार्गिकेचे स्वप्न अखेर साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई : वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढताना नाकीनऊ येत असलेल्या बेस्ट उपक्रमाचे स्वतंत्र मार्गिकेचे स्वप्न अखेर साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमएमआरडीएने मुंबईतील सात रस्त्यांवर अशा विशेष बस मार्गिकेचा आराखडा तयार केला आहे़ युनिफाईड मेट्रोपोलिटिन ट्रान्स्पोर्ट आॅथोरिटीने (उम्टा) या योजनेस हिरवा कंदील दिल्यास बेस्ट बसगाड्यांचा मार्ग वाहतुकीतून मोकळा होणार आहे़गर्दीच्या वेळी मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळे बेस्ट बसगाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे़ परिणामी, गेल्या काही वर्षांमध्ये प्रवाशांनी शेअर रिक्षाचा मार्ग अवलंबला आहे़ त्यामुळे बेस्ट बससाठी या खोळंब्यातून मोकळी मार्गिका देण्याची विनंती प्रशासनाने केली होती़ याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, वाहतूक पोलीस, एमएमआरडीए व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते़ हा प्रस्ताव गेली अनेक वर्षे रखडला आहे़ काही वर्षांपूर्वी बेस्टच्या तत्कालीन अध्यक्षांनी गुजरात दौरा करून बस रेपिड ट्रॉन्झिट सिस्टमची (बीआरटीएस) पाहणी केली़ मात्र हा प्रस्ताव कधी पुढे सरकला नाही़ या वेळीस उम्टाकडे आराखडा सादर झाल्यामुळे बेस्टला आशेची किरणे दिसत आहेत़ सात रस्त्यांवरील वाहतुकीचा आढावा घेऊन वाहतूक पोलिसांनी अहवाल दिल्यानंतर स्वतंत्र मार्गिकेचा प्रयोग होईल, असे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)