निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अपक्षांचे टेन्शन
By Admin | Published: February 21, 2017 04:20 AM2017-02-21T04:20:37+5:302017-02-21T04:20:37+5:30
कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना स्वबळावर निवडून आलेले अपक्ष २०१२ च्या निवडणुकीत निर्णायक ठरले होते़ या पक्षांच्या बळावरच
मुंबई: कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना स्वबळावर निवडून आलेले अपक्ष २०१२ च्या निवडणुकीत निर्णायक ठरले होते़ या पक्षांच्या बळावरच शिवसेना-भाजपा युतीला महापालिकेत सत्ता स्थापन करता आली होती़ यावेळीस अपक्षांची यादीही तब्बल ७१७ वर पोहोचली आहे़ जोरदार प्रचार करीत या अपक्षांनीही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्यासाठी दंड थोपटले आहेत़
२०१२ च्या महापालिका निवडणुकीत एकूण १४ अपक्ष निवडून आले़ या अपक्षांचे समर्थन मिळवत शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली़ या मोबदल्यात अपक्षांना वैधानिक अथवा विशेष समित्यांचे सदस्यत्व तर अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांना सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्षपदही मिळाले़ त्यामुळे अपक्षांची ताकद त्यावेळीच दिसून आली होती़ सत्तेचे गणित ठरविणारे हे अपक्ष ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत़
सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने बंडखोरांची संख्याही अधिक आहे़ यामुळे तब्बल ७१७ अपक्ष निवडणुकीच्या शर्यतीत आहे़ यामध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेसमधील बंडखोरांचा सर्वाधिक समावेश आहे़ अपक्षांची संख्या मोठी असल्याने मतांची विभागाणीही मोठ्या प्रमाणात होणार आहे़ त्यामुळे अपक्षांच्या या फौजेने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धडकी भरविली आहे़ (प्रतिनिधी)
सेना-मनसेत रंगणार दादर-माहिम वॉर
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीम मतदारसंघात २०१२ मध्ये मनसेने शिरकाव केला़ या मतदारसंघातून शिवसेनेला हद्दपार करीत
मनसेने गड काबीज केला़ विधानसभाच्या निवडणुकीत शिवसेनेने हा गड परत मिळवला़ तरीही आमदार शिवसेनेचा आणि नगरसेवक मनसेचे अशी येथील स्थिती आहे़ त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत हा गड परत मिळवण्यासाठी शिवसेनेने सर्व शक्ती पणाला लावली आहे़
तर मनसेनेही हे आव्हान स्वीकारत युद्धच छेडले आहे़ शिवसेनेने या प्रभागांमध्ये आपले दिग्गज उतरविले आहेत़ तर मनसेनेही हे आव्हान परतवून लावण्यासाठी कंबर कसली आहे़ त्यामुळे दादर-माहीम मतदारसंघात आवाज कुणाचा याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़