राज्यात लवकरच मेडिकल टुरिझमसाठी स्वतंत्र संकेतस्थळ - दीपक सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:11 AM2017-11-26T02:11:07+5:302017-11-26T02:11:36+5:30
राज्यात अनेक पंचतारांकित रुग्णालयांमध्ये परदेशातून सुमारे ५० हजार विदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी मुंबई व महाराष्ट्रात दाखल होतात. नुकत्याच झालेल्या इमान प्रकरणावरून मेडिकल टुरिझम हे सर्व विदेशी रुग्णांना सहज, सोपे व स्वस्त होणार आहे.
मुंबई : राज्यात अनेक पंचतारांकित रुग्णालयांमध्ये परदेशातून सुमारे ५० हजार विदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी मुंबई व महाराष्ट्रात दाखल होतात. नुकत्याच झालेल्या इमान प्रकरणावरून मेडिकल टुरिझम हे सर्व विदेशी रुग्णांना सहज, सोपे व स्वस्त होणार आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी मंत्रालयात मुंबईतील विविध रुग्णालयांसमवेत बैठक घेतली. परदेशातून मुंबई तसेच महाराष्ट्रात उपचारासाठी येणा-या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. सर्व पंचतारांकित रुग्णालयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय संचालक यांच्याकडून सूचना मागवल्या असून एसओपी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
रुग्णांना मुंबई किंवा महाराष्ट्राच्या वास्तव्याबद्दल काय सुविधा उपलब्ध करून देता येतील याकडे लक्षपूर्वक पहिले जाईल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्यामार्फत सर्व अॅम्बसींना पत्राद्वारे याबाबत माहिती देण्यात येईल. विमानतळावरच स्टॉल उभे करून सर्व माहिती एका क्लिकवर कशी उपलब्ध करून देता येईल याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
राज्य सरकारकडे माहिती जमा होणार
एसओपीमध्ये मेडिकल व्हिसा ते अॅप्लिकेशन रिमार्क्स अभिप्रायापर्यंत सर्व बाबींचा समावेश करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत एक अॅथॉरिटी तयार करून प्रत्येक येणाºया रुग्णाची नोंद त्याचबरोबर त्याला परवडेल असे रुग्णालय, उपचारपद्धती कोठे उपलब्ध होऊ शकेल याची माहिती देणारे संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून सर्व माहिती राज्य सरकारकडे जमा होईल. उपचाराच्या नावाखाली परदेशी रुग्णाची लूट व उपचारामध्ये हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. संकेतस्थळावर नामांकित रुग्णालये, त्यांच्या विविध अद्ययावत उपकरणांनीयुक्त उपचारपद्धती यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.