बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार; गोपाळ शेट्टी यांची घोषणा
By मनोहर कुंभेजकर | Published: October 28, 2024 08:46 PM2024-10-28T20:46:52+5:302024-10-28T20:47:20+5:30
आज भाजपच्या यादीत बोरिवली मधून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते व बोरीवलीकर संतप्त झाले.
मुंबई-पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर आपण नाराज बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी मी अपक्ष लढणार आहे. उद्या सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मी पक्षाशी अजूनही एकनिष्ठ असल्याचे त्यांना सांगितले.
आज भाजपच्या यादीत बोरिवली मधून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते व बोरीवलीकर संतप्त झाले.तिकीट मिळाले पाहिजे अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी होती.मात्र त्यांना तिकीट नाकारल्यावर आज सायंकाळी सुमारे दोन तास कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
गोपाळ शेट्टी म्हणाले की, बोरिवली ही काही धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यात कुणीही कुठून लढू शकत नाही असं लिहिलेले नाही. परंतु स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते. पहिल्यांदा विनोद तावडेंना आणलं, त्यानंतर सुनील राणेंना आणले मी खासदार होतो लोकांना चालवून घेतले. मला बदलून पीयूष गोयल यांना आणलं. तरीही मी गोयल यांच्या पाठीशी होतो. मात्र आता पुन्हा तसेच झाले. संजय उपाध्याय हे चांगले कार्यकर्ते आणि पक्षासाठी काम केलंय यात शंका नाही परंतु बोरिवली मतदारसंघात वारंवार अशाप्रकारे खेळ करणे बरोबर नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या बोरिवलीने मला दिर्घकाळ नेतृत्वाची संधी दिली. मला सध्या लोकांची भावना जाणवते, तुम्ही जर आता लढले नाही तर येणाऱ्या ५० वर्षात कुणी लढणार नाही. कारण तुमच्या इतका स्वच्छ प्रतिमा आहे, लोक तुमच्या पाठीशी आहेत. बोरिवली मतदारसंघाचं आव्हान स्वीकारले नाही तर ५० वर्ष बोरिवलीचा अशाप्रकारे वापर केला जाईल. ज्या बोरिवलीने मला पुढे आणले त्या लोकांसाठी जे काही करणे मला शक्य आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.
गेल्या ३३ वर्षात मी एकही चुकीचं काम केले असेल तर पक्षाने मला सांगावे, मी मरेपर्यंत पक्षाचं मजुराप्रमाणे काम करणार. एवढा मोठा निर्णय घेताना कुणाशीही चर्चा केला नाही हे योग्य नाही. वारंवार छळ करणे योग्य नाही. ही लढाई मी लढणार आहे. पक्षाचे नेते असे निर्णय करत असतील, चुकीची माहिती देत असतील तर त्या नेत्यांची हकालपट्टी करावी. पक्षाकडे माझ्याबाबतीत काही माहिती असेल तर ती लोकांसमोर जाहीर करावी असे आवाहन त्यांनी केले.