भाजपचा पराभव करून इंडिया आघाडी सत्तेत येणार, अशोक चव्हाण यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:59 AM2023-08-31T01:59:22+5:302023-08-31T06:32:57+5:30
मुंबईतील ‘इंडिया’ बैठकीतील काँग्रेसचे समन्वयक अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाची आकडेवारी सादर करत आम्ही कसा भाजपचा पराभव करू शकतो, असे स्पष्ट केले.
मुंबई : इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा पराभव करून सत्तेत निश्चित येईल, असा दावा इंडियातील नेतेमंडळी करीत आहेत. तर ‘इंडिया’ नावाखाली एकत्र आलेले पक्ष नरेंद्र मोदींचा पराभव करू शकत नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.
मुंबईतील ‘इंडिया’ बैठकीतील काँग्रेसचे समन्वयक अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाची आकडेवारी सादर करत आम्ही कसा भाजपचा पराभव करू शकतो, असे स्पष्ट केले. ‘इंडिया’मध्ये सहभागी असलेल्या २६ राजकीय पक्षांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण २३ कोटी ४० लाख मते मिळाली होती. तर भाजपला २२ कोटी ९० लाख मते मिळाली होती. विरोधकांच्या मतांच्या विभाजनामुळे भाजपला फायदा झाला आणि ते सत्तेत आले, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
भाजपने मध्य प्रदेश, महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे पाडली. तरी देशात आज ‘इंडिया’चे ११ मुख्यमंत्री आहेत. भाजपने कर्नाटकातही आमचे सरकार पाडले. पण पुढील निवडणुकीत मतदारांनी अधिक मोठे बहुमत दिले. महाराष्ट्रातही आमचे सरकार पाडले असले तरी राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असा दावा चव्हाण यांनी केला.