इंडिया आघाडीच्या 'मी पण गांधी' पदयात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 03:33 PM2023-10-02T15:33:20+5:302023-10-02T15:34:02+5:30
कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. यादरम्यान, कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
मुंबई : आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 'मी पण गांधी' हा नारा देत मुंबईत मुंबईत इंडिया आघाडीने पदयात्रा काढण्यास सुरुवात केली. मात्र, या यात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. यादरम्यान, कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात येत आहे. या पदयात्रेत काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मात्र, या पदयात्रेला परवानगी नसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरु केली. यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.
दरम्यान, देशभरात सध्या भाजपा 'फोडा आणि राज्य करा' ही इंग्रजांची नीती वापरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या विद्वेषाच्या घटना घडत आहेत, तो याच कूटनीतीचा परिपाक आहे. या घटनांचा निषेध करतानाच समाजात सद्भावनेचा विचार रूजवण्याची गरज आहे, असे सांगत प्रेम, सद्भावना, शांतता हा महात्मा गांधीजींचा विचार समाजमानसात पोहोचण्यासाठी इंडिया आघाडीच्यावतीने 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 'मी पण गांधी' हा नारा देत मुंबईत पदयात्रा काढण्यात येत आहे.
पदयात्रेसाठी असा ठरलेला मार्ग
आज 2 ऑक्टोबर रोजी पदयात्रा काढण्याची वेळ ठरली होती. ही पदयात्रा मेट्रो सिनेमा - फॅशन स्ट्रीट - हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा पदयात्रेचा मार्ग ठरला होता. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ इंजिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या स्मृतिंना वंदन करणार होते. परंतु, रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.