I.N.D.I.A.ची गरुडझेप! भयमुक्त भारतास विजयी करण्यासाठी वज्रमूठ सज्ज; ठाकरे गटाला ठाम विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 08:26 AM2023-08-31T08:26:59+5:302023-08-31T08:27:58+5:30
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: भाजपने इंडिया आघाडीची धास्ती घेतली असून, ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: ‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. मुंबईत तिसऱ्या बैठकीचे आयोजन आज व उद्या होत आहे. देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू–कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. चीनपुढे गुडघे टेकणाऱ्या आजच्या भारतास विजयी करण्यासाठी ही ‘इंडिया’ची वज्रमूठ सज्ज आहे, असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यांचा स्वाभिमान, प्रांतांची अस्मिता, सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती व त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे, तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’चा गरुड पक्षी झेपावला आहे! मुंबईतील बैठकीचा तोच संदेश आहे! भाजपने इंडिया आघाडीची इतकी धास्ती घेतली की, स्वयंपाकाचा गॅस २०० रुपये स्वस्त केला. बैठका वाढत जातील तशी ही स्वस्ताई वाढत जाईल. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीची ही कमाल आहे. ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील प्रमुख नेते मुंबईत उतरले आहेत. संतापाच्या ठिणगीतून ‘इंडिया’ आघाडीचा जन्म झाला आहे. पंतप्रधान मोदी हे अचानक विश्वगुरू बनले आहेत, अशी टीका ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.
चीनने लडाखची जमीन आधीच गिळंकृत केली
ब्रिक्स संमेलनासाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेत गेले. मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तेथे भेट घेतली व चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवर नाराजी व्यक्त केली. पण मोदींची पाठ वळताच चिन्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने आपल्या देशाचा नवा नकाशा जाहीर केला. त्यात अक्साई चीनबरोबर अरुणाचल प्रदेशलाही चीनचा भाग दाखवला. चीनने लडाखची जमीन आधीच गिळंकृत केली आहे. चीन भूतानजवळ त्यांच्या वसाहती बनवत आहे. मोदी यांनी त्याच चिनी राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या ‘जी-२०’ संमेलनासाठी खास आमंत्रित केलेय. भारताची जमीन रोज ओरबाडणाऱ्या या चिनी सैतानाला भारतात ‘जी-२०’साठी बोलावू नये व आमच्या सैनिकांचा अपमान करू नये अशी जोरदार मागणी आता उठू लागली आहे. लोक आता मोदींना प्रश्न विचारीत आहेत. ही हिंमत ‘इंडिया’ आघाडीने निर्माण केली व ‘इंडिया’ आघाडी देशातील हुकूमशाहीला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास लोकांना वाटत आहे. चीनच्या आक्रमणाचा विषय अत्यंत गंभीर आहे. त्या आक्रमणावर मोदी-शहा काहीच बोलायला तयार नाहीत, अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.
‘इंडिया’ आघाडीमुळे देशभक्तीची ठिणगी पडली
‘इंडिया’ आघाडीमुळे देशभक्तीची ठिणगी पडली आहे व भाजपप्रमाणे हे ढोंगी देशप्रेम नाही. देशभरात वणवा पेटवून त्यांना निवडणुकांना सामोरे जायचे आहे, पण ‘इंडिया’ आघाडी हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही. ‘इंडिया’ आघाडीची ऐक्याची वज्रमूठ हळूहळू घट्ट होत आहे. २७ पक्ष एकत्र आले व त्यांच्यात कोणतीही ईर्षा नाही. भारतीय जनता पक्षाने कितीही टीका केली तरी ‘इंडिया’ आघाडी ही एक स्फोटक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला २०२४ च्या आधीच उलथवून टाकेल अशी भीती त्यांना मनातून वाटते. ही भीती त्यांच्या कृतीवरून आणि अस्वस्थ हालचालींवरून दिसते. राहुल गांधींना देशभरात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात आहे. हेच ‘इंडिया’ आघाडीचे यश आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.