भारतातही ऑनलाइन गेमिंगवर निर्बंध लागू करण्याची गरज; आरोग्यावर होतो परिणाम, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:57 AM2021-09-01T07:57:51+5:302021-09-01T07:57:58+5:30

तज्ज्ञांचे मत : मुलांच्या शिक्षणासह आरोग्यावर होतो विपरीत परिणाम

India also needs to impose restrictions on online gaming; Health effects, experts say pdc | भारतातही ऑनलाइन गेमिंगवर निर्बंध लागू करण्याची गरज; आरोग्यावर होतो परिणाम, तज्ज्ञांचे मत

भारतातही ऑनलाइन गेमिंगवर निर्बंध लागू करण्याची गरज; आरोग्यावर होतो परिणाम, तज्ज्ञांचे मत

Next

मुंबई : मुलांमध्ये ‘ऑनलाइन गेमिंग’ची वाढती ‘व्यसनाधीनता’ चिंताजनक टप्प्यावर पोहोचल्याने चीनने त्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलांना आता आठवड्यातून तीन दिवस फक्त एक तास ऑनलाइन खेळ खेळता येतील. चीनचा हा निर्णय अत्यंत योग्य असून, भारतानेही अशाप्रकारचे निर्बंध लागू करण्याबाबत विचार करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

दिवसागणिक मुले ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊ लागली आहेत. कोरोनाकाळात शाळा ऑनलाइन सुरू असल्याने मुलांचे अधिक फावले आहे. गल्लोगल्ली, इमारतीखाली घोळकेच्या घोळके दिवसभर गेम खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेच, पण आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. जास्त वेळ मोबाइल वापरल्यामुळे बहुतेक मुलांना डोळ्यांचे आजार जडू लागले आहेत. सोबतच डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी अशा त्रासांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉक्टर तसेच आरोग्य तज्ज्ञ दिनेश सोळुंके यांनी सांगितले.

भारतात वेळीच अशाप्रकारचे निर्बंध लागू करण्याची गरज सायबर तज्ज्ञ निखिल मानव यांनी व्यक्त केली. गेमच्या व्यसनाधीनतेमुळे मुले अविचारी बनली आहेत. कोणतेही टोकाचे पाऊल सहज उचलू लागली आहेत. पालक दिवसभर त्यांच्याकडे लक्ष देत राहिले तर घर कसे चालवणार, हाही प्रश्न आहे. त्यामुळे यावर एकमेव तोडगा म्हणजे गेमवर निर्बंध लावणे आणि गेमिंग कंपन्यांनाही निर्बंधांच्या कक्षेत आणणे. युवकांचा देश असलेल्या भारताने वेळीच याबाबत धोरण ठरविले नाही, तर पुढील पिढीच्या भविष्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचेही मानव म्हणाले.

सातत्याने गेम खेळल्याने मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. शिवाय मुलांतील चिडचिडेपणा वाढणे, दुसऱ्या गोष्टींमध्ये लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होणे असे काही प्रकारही समोर येऊ लागले आहेत. ऑनलाइन गेम खेळण्याच्या नादात मुलांनी मैदानी खेळ बंद केल्याने लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे.
- डॉ. दिनेश सोळुंके,  आरोग्य तज्ज्ञ

चीनमध्ये नियम काय?

चीन सरकारच्या नव्या नियमांमुळे मुलांना आता आठवड्यातील तीन दिवस फक्त एक तास ऑनलाइन खेळ खेळता येतील. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुले रात्री ८ ते ९ या वेळेतच ऑनलाइन खेळ खेळू शकतील. नवे नियम लागू करण्याआधी चीनमधील मुलांना प्रतिदिन ९० मिनिटे आणि सुटीच्या दिवशी तीन तास ऑनलाइन खेळ खेळण्याची मुभा होती.

Web Title: India also needs to impose restrictions on online gaming; Health effects, experts say pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.