मुंबई : सत्तेसाठी धार्मिक भावना चेतवून मतदारांची सद्सद्विवेक बुद्धी बधिर केली जाते. निवडणुकांत कोटींची उधळण करणा-या भांडवलदारांच्या सोयीप्रमाणे नियोजन करण्यात येते. कंत्राटदारांच्या हाती आर्थिक नाड्या राहिल्याने आर्थिक विषमता पराकोटीची वाढली आहे. दारिद्र्यामुळे कुपोषित भारत आणि श्रीमंतांची इंडिया अशी समाजाची विभागणी झाली आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत मनवेल तुस्कानो यांनी मांडले. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या विचारांच्या द्वेषातून झाल्या, असेही ते म्हणाले.मुंबई मराठी पत्रकार संघ येथे ‘चले जाव’ चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित परिसंवादात मनवेल तुस्कानो बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत अन्वर राजन, ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ, प्रा. पुष्पा भावे, तुषार गांधी, प्रा. पूजा ठाकूर, अमरेंद्र धनेश्वर उपस्थित होते.तुस्कानो म्हणाले, स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्यासारख्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल माहीत नव्हते. आज समाजात विष कालवले जात आहे, याचा खेद वाटतो.
‘भारत आणि इंडिया ही विभागणी धोकादायक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:03 AM