लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांची रविवारची सकाळच उत्साहात सुरू झाली. शहर उपनगरात सकाळपासूनच क्रिकेटच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी केली. सकाळपासून शहर उपनगरातील चित्रपटगृह क्रिकेट चाहत्यांनी ‘हाऊसफुल्ल’ झालेले दिसून आले. त्यामुळे माॅल, चित्रपटगृहाबाहेर क्रिकेटच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. तर दुसरीकडे काही चाहत्यांना बराच वेळ वाट पाहूनही तिकीट न मिळाल्याने थिएटरच्या गेटवरूनच मागे फिरावे लागल्याचे दिसून आले.
मुंबईत लोअरपरळ येथील पीव्हीआर, आरसीटी माॅल येथील आयनाॅक्स, मरीन लाइन्स आयनोक्स, नरीमन पाॅईंट येथील आयनाॅक्स, वरळी अट्रीया माॅल, मेट्रो आयनाॅक्स, जुहू- अंधेरी येथील पीव्हीआर सिनेमागृह क्रिकेटच्या चाहत्यांनी अक्षरश: गर्दीने वाहून गेलेले दिसून आले. वरळीच्या माॅलमध्ये एकाच वेळीच चार स्क्रीनवर क्रिकेट सामन्याचे प्रक्षेपण असल्यामुळे येथे चारचाकी- दुचाकी गाड्यांची वर्दळ दिसून आली, तर निळ्या रंगांच्या जर्सी परिधान केलेल्या क्रिकेट चाहत्यांनी जल्लोषात क्रिकेट खेळाडूंचे मनोबल वाढविल्याचे दिसून आले.
या क्रिकेटच्या सामन्याच्या शोचे दर हजार - दीड हजार रुपयांच्या पुढे असतानाही चाहत्यांनी कुठलीही तमा न बाळगता प्रक्षेपणाला गर्दी केली. पाॅपकाॅर्न, कोल्ड ड्रींक्स आणि जंक फूडवर ताव मारत रविवारचा दिवस या चाहत्यांनी सिनेमागृहांमध्ये क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेत घालवला. टीम इंडियाची इनिंग अखेरीस येताना या चाहत्यांच्या मनात धाकधूकही जाणवली. काही वेळ सिनेमागृहसुद्धा स्तब्ध झालेले दिसून आले. मात्र, अखेरीस हा उत्साह न मावळणारा होता, आपल्या आवडत्या खेळाडूंना आणि खेळाला प्रोत्साहन देताना दिसून आले.
लहानग्यांची हजेरीही लक्षणीयक्रिकेट चाहत्यांच्या या गर्दीत आपल्या छोट्या बॅग घेत खाऊचे पॅकेट्स सांभाळत या लहानग्यांनीही थिएटरमध्ये सामना पाहण्यासाठी हजेरी लावलेली दिसून आली. आपल्या लहानग्यांना ऐतिहासिक सामना थिएटरमध्ये पाहता यावा, त्या सामन्याचा थरार अनुभवता यावा, यासाठी पालकांनी चिमुरड्यांना सोबत घेऊन आल्याचे आवर्जून सांगितले.
सिनेमागृहाबाहेरच थाटले स्क्रीनिंग काही सिनेमागृहांमध्ये चाहत्यांना तिकीट न मिळाल्याने निराशा पदरी पडली. मात्र, तरीही उत्साह टिकवून ठेवण्यासाठी थेट सिनेमागृहांबाहेरील आवारातच वेगवेगळे मोबाइल एकाच वेळी एकत्र करत काही चाहत्यांच्या चमूने स्क्रिनिंग केले. त्यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरलेली दिसून आली. शिवाय, या चाहत्यांनी उत्साहात इंडिया... इंडिया अशा घोषणा देत खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या.