नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचं नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 10:59 AM2019-05-30T10:59:28+5:302019-05-30T11:09:03+5:30
दिल्लीतील मोदींचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. दिल्लीतील त्यांचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून त्यांनी मोदींची स्तूती केली आहे. तसेच मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संकटात येईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. ज्यांनी ही भीती व्यक्त केली व आपली लढाई मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध असल्याची आरोळी ठोकली अशा मंडळींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या असं ही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 2014 मध्ये मोदी यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्यास पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आले होते. मात्र या विषाची परीक्षा पुन्हा नको तसेच देशभावनेच्या विरोधात काही करायचे नाही असे मोदी यांनी पक्के केले आहे. मोदी यांनी पुन्हा देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजनाच असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. प्रचंड विजय मिळाल्यावर मोदी यांनी विरोधकांविषयी एक शब्दही उच्चारला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नवे राज्य संयमाने व मानवतेच्या भावनेने काम करील असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच मोदी यांच्या आजच्या शपथ सोहळ्याविषयी जगभरात कुतूहल आहे असं ही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सामनाचा आजचा अग्रलेख
- नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संकटात येईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. ज्यांनी ही भीती व्यक्त केली व आपली लढाई मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध असल्याची आरोळी ठोकली अशा मंडळींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. पण मोदी हे लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत व घटनेच्या चौकटीत राहूनच पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत.
- शपथविधी सोहळय़ासाठी ममता बॅनर्जी यांना दिलेले निमंत्रण त्यांनी नाकारले. हे लोकशाहीच्या चौकटीत बसत नाही. प. बंगालात निवडणूक काळात हिंसाचार झाला हे सत्य आहे. हिंसाचारात जे मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास बोलावले हे काही रुसण्याचे कारण होऊ शकत नाही. ही सर्व कुटुंबे बांगलादेशी नसून हिंदुस्थानी नागरिक आहेत व इतर सगळय़ांप्रमाणेच पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळय़ास हजर राहण्याचा अधिकार त्यांना आहे. ममता व त्यांच्या पक्षाला हे मान्य नसेल तर त्या लोकशाही मानत नाहीत हे नक्की.
- ओडिशात निवडणूक सुरू असतानाच मोठे तुफान आले. त्यात राज्याचे नुकसान झाले. पंतप्रधान मोदी यांनी ओडिशाला मोठी मदत केली आहे. ओडिशात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. आंध्रचे विजयी वीर जगनमोहनही पंतप्रधानांना भेटले व त्यांनी आंध्रसाठी मागण्या केल्या. मोदी यांनी त्या मान्य केल्या. आंध्रातदेखील भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा आहे. निवडणुकीत जे झाले ते विसरून जायला हवे अशी भूमिका मोदी यांनी घेतली आहे.
- प्रचंड विजय मिळाल्यावर मोदी यांनी विरोधकांविषयी एक शब्दही उच्चारला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नवे राज्य संयमाने व मानवतेच्या भावनेने काम करील असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच मोदी यांच्या आजच्या शपथ सोहळ्याविषयी जगभरात कुतूहल आहे.
- मोदी यांच्या दुसऱ्या पर्वाचा आज शुभारंभ होत आहे. जगभरातले पाहुणे त्यासाठी येत आहेत, पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे निमंत्रितांच्या यादीत नाहीत. 2014 मध्ये मोदी यांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्यास पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आले होते. मात्र या विषाची परीक्षा पुन्हा नको तसेच देशभावनेच्या विरोधात काही करायचे नाही असे मोदी यांनी पक्के केले आहे.
- मोदी यांनी पुन्हा देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजनाच आहे. निवडणुकांपूर्वी ‘टाइम’ मॅगझिनने मुखपृष्ठावर मोदी यांचा उल्लेख ‘India’s Divider in Chief’ म्हणजे फूट पाडणाऱ्यांचा प्रमुख असा केला होता. आता ‘टाइम’ने पल्टी मारून सांगितले आहे की, मोदी हे अखंडता व राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहेत. हा आंतरराष्ट्रीय बदल समजून घेतला पाहिजे.
- उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहेच, पण 2014 नंतर मोदी यांचा सूर्य मावळला कुठे? 2019 ला तर तो अधिक प्रखर तेजाने तळपत आहे. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीच्या वज्रमुठीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे.
- मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत प्रधानसेवक होते, चौकीदार होते. आज पालक बनले आहेत. त्यांचा आधार वाटावा, विश्वास वाटावा असे वातावरण निर्माण झाले व तोच त्यांच्या विजयाचा राजमार्ग ठरला. दिल्लीतील त्यांचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे.