गुंतवणुकीसाठी भारतच जगात सरस; गेल्या वर्षात २७.३७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 09:55 AM2022-01-12T09:55:11+5:302022-01-12T09:55:36+5:30
ब्रिटिश सल्ला संस्था ‘सेंटर फॉर बिझनेस अँड इकॉनॉमिक रिसर्च’ने (सीईबीआर) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : कोविड-१९ साथीमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही २०२१-२२मध्ये भारतात २७.३७ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आली आहे. आदल्या वर्षी मिळालेल्या १६.९२ अब्ज डॉलर एफडीआयच्या तुलनेत ही रक्कम ६२ टक्के अधिक आहे.
ब्रिटिश सल्ला संस्था ‘सेंटर फॉर बिझनेस अँड इकॉनॉमिक रिसर्च’ने (सीईबीआर) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था यंदा फ्रान्सला मागे टाकील, तसेच २०२३मध्ये ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनेल. सीईबीआरने म्हटले की, जगाचा जीडीपी प्रथमच १०० लाख कोटी डॉलरचा होईल. २०३०पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकून सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश होईल.
भारतास २०२४-२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने निश्चित केले असले तरी, अजूनही भारताची अर्थव्यवस्था ३ लाख कोटी डॉलरपेक्षाही कमी आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट गाठण्यास ३ ते ४ वर्षांचा उशीर होऊ शकतो. ‘अर्नेस्ट अँड यंग इंडिया’च्या (ईवाय) अंदाजानुसार, २०२९-३० मध्ये हे उद्दिष्ट भारत प्राप्त करू शकतो. नाणेनिधीच्या नव्या अनुमानानुसार मात्र भारत पुढील पाच वर्षात जागतिक नेतृत्वस्थानी येऊ शकतो.
दीर्घकालीन मार्गक्रमणावर परिणाम नाही : चंद्रशेखरन
टाटा उद्योग समुहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले की, ‘कोविड-१९ साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन मार्गक्रमणावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही.’ मायक्रोसॉफ्टच्या एका कार्यक्रमात चंद्रशेखरन यांनी सांगितले की, साथीच्या नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा पूर्णत: खुली होईल, तेव्हा वृद्धी मजबूत होईल, असे मला वाटते. तरुणांसह अधिकाधिक लोक मध्यमवर्गात येत आहेत. भारतीय वृद्धी अधिक मूलभूत पातळीवर वाढत आहे.