मुंबई : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये परस्पर मैत्री आणि सहकार करार व्हायला हवे. त्या माध्यमातून मुक्त व्यापाराला चालना मिळायला हवी. दोन देशांमधील सीमावादाचा प्रश्न लवकरात लवकर मिटवून भारत-चीन मैत्रीचे नवे पर्व सुरू व्हावे, असे प्रतिपादन चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठातील सेंटर फॉर इंडिया चायना स्टडिज येथे आयोजित कार्यक्रमात केले.आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई विद्यापीठ आणि चीन मुंबई दूतावासातर्फे मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर इंडिया चायना स्टडिज केंद्रात दस्तावेज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारत-चीन मैत्रीच्या ऐतिहासिक दस्तावेजापैकी डॉ. द्वारकानाथ कोटनीस यांना चीनचे अध्यक्ष माओ यांनी पाठविलेल्या ऐतिहासिक शोकसंदेशाचे या वेळी लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई बोलत होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, सोलापूरच्या महापौर सुशीला आवुटे, राज्याचे राजशिष्टाचारप्रमुख सुमित मलिक, चीनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल झेन झियुआन आणि आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे मुंबईचे अध्यक्ष सुधिंद्र कुलकर्णी उपस्थित होते.चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि माजी अध्यक्ष माओ झेडाँग यांच्याविषयी लाऊ झाओहुई म्हणाले की, झेडाँग उत्तम सुलेखनकार होते. त्यांच्या चीनबाहेर असलेल्या तीन सुलेखन शैलीतील पत्रांपैकी एक पत्र म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पाठविलेला शोकसंदेश आहे. डॉ. कोटणीस यांच्या निधनास ७५ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने या शोकसंदेशाचे नव्याने जतन करण्यात आले आहे. भारत-चीन मैत्रीच्या या ऐतिहासिक दस्तावेजाचे लोकार्पण ही सन्मानाची बाब आहे, असे लाऊ झाओहुई यांनी सांगितले. या माध्यमातून भारत-चीन यांच्यात शैक्षणिक मैत्रीचा धागा विणला जावा, अशी भावना कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठात उभारण्यात आलेल्या एका सभागृहाला डॉ. द्वारकानाथ कोटणीस सभागृह असे नाव देऊन विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचा गौरव करण्यात यावा, असे सुधिंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, हा शोकसंदेश डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या सोलापूर येथील जन्मस्थानी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘भारत-चीन सीमावाद मिटवा’
By admin | Published: January 12, 2017 6:37 AM