Join us

व्यापाऱ्यांचा आज भारत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘कॅट’ने जीएसटीच्या नियमांच्या समिक्षेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘कॅट’ने जीएसटीच्या नियमांच्या समिक्षेची मागणी करत शुक्रवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे.

जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्या, फूड सेफ्टी ॲक्टमधील तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी. तसेच टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये. या मागण्यांसाठी शुक्रवारी भारतातील अनेक व्यापारी संघटनांनी एक दिवसीय राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये लाखो व्यापारी व दुकानदार सहभागी होणार आहेत. या बंदमुळे किराणा व्यापार, माल वाहतूक, मसाले बाजार, भांडी बाजार, सौंदर्य प्रसाधने, मोबाइल व संगणक विक्री या सर्व क्षेत्रांवर परिणाम जाणवणार आहे. मुंबईतील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच या बंदमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजदेखील सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

महाराष्ट्रातील व्यापारी वाहतूकदारांनी या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या बंद मध्ये महाराष्ट्रातील विविध वाहतूक व्यापारी संघटना ठिकठिकाणी दोन तासांचे धरणे आंदोलन, जीएसटी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अशा प्रकारचे आंदोलन करणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.