मुंबई - देशात 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. त्यामुळे 1 एप्रिलपासून देशभरात 45 वर्षांच्यावरील नागरिकांना लस टोचण्यात येत आहे. गावपातळीपासून ते राजधानीतील विविध रुग्णालयात ही लस देणे सुरू आहे. मात्र, आता युवकांचेही लसीकरण सुरू व्हावे, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
देशात सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनावरील लस देण्यात आली. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याची मागणी केली होती. त्यास, प्रतिसाद देत 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. आता, युवकांनाही लस देण्याची मागणी होत आहे. जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतेय. त्यामुळे 18 ते 35 वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी ही नम्र विनंती, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटरद्वारे केली आहे. तसेच, जीव धोक्यात घालून फिरणाऱ्या पत्रकारांनाही लस द्यावी, अशीही विनंती त्यांनी केली असून ती मान्यही करण्यात आली आहे.
लसीकरण गतीमान
16 जानेवारीपासून भारतात कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतेय. पण, आता 45 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लसीकरण गतीमान करण्या आलंय. त्यामुळेच, तरुणांनाही लस देण्याची मागणी होत आहे.
लसीच्या डोसमध्ये अंतर
लशींच्या दोन डोसांमधील अंतर केंद्र सरकारने वाढवलं आहे. पूर्वी 28 दिवसानंतर लसीचा दुसरा डोस घ्यावा असे निर्देश होते आता 4 ते 6 आठवड्यांमध्ये लसीचा दुसरा डोस घ्यावा असे निर्देश सरकारने दिले आहेत.
लसीकरण मोहिमेत कोविनचा उपयोग
या लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो.
पत्रकारांनाही लसीकरणाची सोय
पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असेही त्यांनी भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.