नवी दिल्ली - मोदी सरकारने पोलिओ लसीकरण मोहिम पुढे ढकलली आहे. पोलिओ लसींच्या कमतरतेमुळे आगामी लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील सर्वच राज्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. पण, बिहार, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये 18 जानेवारीपर्यंत पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. मात्र, तेही लसीकरण 03 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. 3 फेब्रुवारी रोजी या राज्यांत लसीकरण मोहिम राबविण्यात येईल.
देशभरात पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जानेवारी महिन्यात 5 वर्षांखालील चिमुकल्यांना पोलिओचा डोस पाजण्यात येतो. राष्ट्रीय लसीकरण दिवसही या महिन्यात साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या सुचनेनुसार वर्षातून दोनदा ही लसीकरण मोहिम घेण्याचे बजावण्यात आले आहे. मात्र, यंदा देशात पोलिओ लसीकरणासाठी ओपीव्ही आणि आयपीव्ही या दोन्ही प्रकारच्या लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे यंदा लसीकरण मोहिम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत बोलताना, लवकरच हा तुटवडा संपुष्टात येऊन लसींचा पुरवठा होईल, असे आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ओपीव्ही ही प्राथमिक लसीकरण चाचणी आहे. तर आजारांपूर्वीचा काळजी म्हणून आयपीव्ही ही लस बालकाला टोचण्यात येते. सन 2016 मध्ये जगभरातील बालकांना किमान एकतरी आयपीव्ही लसीचा डोस देण्याचं बजावण्यात आलं होतं.