२० वर्षांत जगातील सर्वात जास्त हवाई वाहतूक होणार भारतातून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:40 AM2018-12-22T06:40:50+5:302018-12-22T06:41:03+5:30
भारतातील हवाई वाहतुकीचे क्षेत्र सातत्याने विस्तारत असून पुढील २० वर्षांत जगातील सर्वात जास्त हवाई वाहतूक देशातील विमान वाहतूक क्षेत्राद्वारे होईल, असा विश्वास बोइंगचे आशिया पॅसिफिक व भारत विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुंबई : भारतातील हवाई वाहतुकीचे क्षेत्र सातत्याने विस्तारत असून पुढील २० वर्षांत जगातील सर्वात जास्त हवाई वाहतूक देशातील विमान वाहतूक क्षेत्राद्वारे होईल, असा विश्वास बोइंगचे आशिया पॅसिफिक व भारत विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
देशातील विमानतळांची व विमान प्रवाशांची संख्या वाढत असल्याने पुढील २० वर्षांत देशाच्या वाढत्या हवाई क्षेत्राची गरज पूर्ण करण्यासाठी ३२० बिलीयन डॉलर किमतीच्या २ हजार ३०० विमानांची, तर जगभरातील गरज पूर्ण करण्यासाठी ६.३ ट्रिलियन
डॉलर किमतीच्या ४२ हजार
७३० विमानांची गरज भासणार
आहे, अशी माहिती केसकर यांनी दिली.
देशातील हवाई प्रवाशांची संख्या वाढत असतानाही विमान कंपन्यांना मात्र तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे यामधून मार्ग काढण्यासाठी विमान कंपन्यांनी आपल्या धोरणात बदल करणे गरजेचे आहे. भारतात हवाई वाहतूक क्षेत्र ज्या वेगाने वाढत आहे, त्याप्रमाणात इतर कोणत्याही क्षेत्रात वाढ होत नसल्याचे ते म्हणाले. सध्या देशातील २ कोटी ३० लाख प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. तर विमानातून दररोज ३ लाख ७५ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सध्या रेल्वेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी १ टक्का प्रवाशांनीदेखील विमान प्रवासाचा मार्ग स्वीकारल्यास विमान प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतातील विमान कंपन्यांनी बोइंगकडे ४०० पेक्षा अधिक विमानांची मागणी नोंदवली आहे. आगामी २० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ३५० टक्के वाढून ८ ट्रिलियन डॉलर होईल व ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. भारतातील विमान कंपन्यांनी वाढीकडे लक्ष देण्याऐवजी नफा मिळवण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला. गतवर्षीच्या तुलनेत विमान प्रवाशांमध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. दर महिन्याला १ कोटी प्रवासी प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एअर टॅक्सीमुळे अवकाश व्यवस्थापनावर ताण’
भारतातील लो कॉस्ट कॅरिअर विमान कंपन्यांद्वारे एकूण प्रवाशांच्या तब्बल ६० टक्के प्रवासी प्रवास करतात. डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया, जेट इंधनाचा वाढता दर यामुळे विमान कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याकडे डॉ. दिनेश केसकर यांनी लक्ष वेधले.
एअर टॅक्सीमुळे अवकाशातील व्यवस्थापनावर ताण पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. बायोफ्युएलचा पर्याय पर्यावरणपूरक असला तरी व्यावहारिकदृष्ट्या उपयोगी ठरण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.