चीननंतर भारतातून सर्वाधिक ‘फेन्टानील’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:34 AM2019-07-15T06:34:20+5:302019-07-15T06:34:26+5:30

अमेरिका, युरोपसह जगात सर्वात घातक रासायनिक अमली पदार्थ अशी ओळख असलेल्या ‘फेन्टानील’ने कोकेन, हेरॉइनला मागे टाकले आहे.

India has the highest 'Fentalil' after China | चीननंतर भारतातून सर्वाधिक ‘फेन्टानील’

चीननंतर भारतातून सर्वाधिक ‘फेन्टानील’

Next

- मनीषा म्हात्रे 
मुंबई : अमेरिका, युरोपसह जगात सर्वात घातक रासायनिक अमली पदार्थ अशी ओळख असलेल्या ‘फेन्टानील’ने कोकेन, हेरॉइनला मागे टाकले आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे चीनपाठोपाठ भारतातून अमेरिका, युरोपीय देशांमध्ये ‘वन लेअर लेस’ पद्धतीद्वारे फेन्टानीलसह अन्य रासायनिक ड्रग्जचा पुरवठा केला जात आहे. यात कच्चे मिश्रण भारतात तयार करून उर्वरित एक टक्का मिश्रण परदेशात मिसळून अमली पदार्थ तयार केले जात असल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडत आहे.
मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी फेन्टानीलचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात राजकोटच्या कारखान्यातून दीपक मेहताला अटक करत अधिक तपास सुरू आहे. फेन्टानीलमुळे अमेरिकेत ३३ हजार जणांचा बळी गेला. हा अमली पदार्थ बनवण्यासाठी मोठी रासायनिक प्रक्रिया पार पाडावी लागते. या प्रक्रियेअंती तयार झालेला अमली पदार्थ एखाद्याकडे सापडल्यानंतर त्याच्यावर अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार कारवाई होते. ‘वन लेअर लेस’ पद्धतीने हा पदार्थ बनवण्यात आल्याने अर्धवट तयार रसायनांचे मिश्रण हाती लागते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना अडथळा निर्माण होत आहे. मात्र याच चोर मार्गाने अमेरिका, युरोपीय देशांमध्ये हे मिश्रण पाठवून अंतिम प्रक्रिया होताच ते अन्य देशांमध्ये पाठविण्यात येतात. त्यात आता भारतातूनही तशाच पद्धतीने ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती एएनसीच्या तपासात उघड झाली आहे.
‘वन लेअर लेस’ पद्धतीने अमेरिका, युरोपसह जगातील विविध भागांत चीनमधून सर्वाधिक फेन्टानीलचा पुरवठा होत आहे. त्यात चीनपाठोपाठ या निर्यातीत भारताचा दुसरा क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती एएनसीने दिली. गेल्या दोन ते अडीच वर्षांत अशा पद्धतीने तस्करीचा टेÑंड वाढला आहे. जगातील वाढता धोका लक्षात घेता, फेन्टानील किंवा त्याचे कच्चे मिश्रण निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. अलीकडेच तसे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत.
मात्र तरीदेखील छुप्या पद्धतीने याचा पुरवठा सुरू आहे. आतापर्यंत २३९ ड्रग्जचे प्रकार समोर आले. त्यात, एमडी, कोकेन, हेरॉइनपेक्षा ‘फेन्टानील’ सर्वाधिक घातक असल्याचे शिवदीप लांडे यांनी सांगितले. अन्य ड्रग्जच्या तुलनेत याच्या एक मिलीग्रॅमच्या अंशातच नशा चढते आणि याच्या ओव्हरडोसने मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त आहे.
>इटलीतील तस्कर टोळ्यांचा सहभाग
रासायनिक अमली पदार्थांसाठी आवश्यक कच्ची मिश्रणे, अन्य रसायने चोरट्या मार्गाने मॅक्सिकोतून अमेरिकेत पोहोचवली जातात. मात्र तेथे तयार झालेले रासायनिक अमली पदार्थ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम इटलीतील तस्कर टोळ्या करतात. त्यामुळे एएनसीने अटक केलेल्या दीपक मेहताने नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करून फेन्टानील इटलीतील तस्कर टोळ्यांना पोच केल्याचा संशय आहे.भूल देण्यासाठीच्या, मनोविकारांवरील औषधांमध्ये फेन्टानीलचा वापर होतो. मात्र याच रसायनाचा वापर अमली पदार्थ म्हणूनही केला जातो. विशेषत: अमेरिका आणि युरोप खंडात क्षमता वाढवण्यासाठी कोकेनमध्ये फेन्टानीलचा अंश मिसळला जातो. तसेच कोकेनप्रमाणे हुंगून, चाखून किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात सोडून फेन्टानीलची नशा केली जाते. एक मिलिग्रॅम फेन्टानीलची क्षमता १ ग्रॅम कोकेनपेक्षा कैकपटीने जास्त असते. कोकेनपेक्षा स्वस्त असल्याने फेन्टानीलच्या आहारी जाणाऱ्यांचे आणि त्यामुळे मृत्यू होणाºयांचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे.
>दुबई कनेक्शन
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये फेन्टानीलचा सर्वाधिक पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले. या रॅकेटचा मुख्य स्रोत दुबईत असल्याचेही उघड झाले. त्यानुसारही अधिक तपास सुरू आहे.

Web Title: India has the highest 'Fentalil' after China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.