मुंबई: दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल सहा दिवसांनंतर पुन्हा ४० हजारांवर पोहोचला आहे. देशात गुरुवारी ४१ हजार नवे कोरोनाबाधित सापडले व आणखी ४९० जणांचा संसर्गाने मृत्यू झाला. मात्र दिलासादायक म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
भारतात आजवर ४८ कोटी ७३ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर कोरोना लसीचे ५२.३६ कोटी डोस नागरिकांना देण्यात आले. याचपार्श्वभूमीवर उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे जागतिक माध्यमांना सुनावलं आहे.
भारतातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीविषयी वृत्तांकन करणाऱ्या जागतिक माध्यमांनी भारताचं यश देखील दाखवावं, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तसेच त्यांनी एक टाईम लॅप्स व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये भारतात झालेल्या लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली आहे.
आनंद महिंद्रा ट्विट करत म्हणाले की, हे थक्क करून सोडणारं यश आहे. आपल्या लोकसंख्येमुळे टक्केवारीच्या बाबतीत हे प्रमाण कमी दिसतंय. पण तरीही, जागतिक माध्यमांनी भारतानं मिळवलेलं हे प्रचंड यश दाखवायला हवं. जेवढे कष्ट आपलं अपयश दाखवण्यासाठी ते घेतात, तेवढेच कष्ट घेऊन त्यांनी हे यश देखील दाखवावं, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये १ फेब्रुवारीपासून ११ ऑगस्टपर्यंत भारतात कशा पद्धतीने लसीकरणाचं प्रमाण वाढत गेलं, याचा आलेख देण्यात आला आहे. त्यासोबतच, जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण कसं वाढत गेलं, हे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
अमेरिकेत ३ कोटी झाले बरे
अमेरिकेत बरे झाले ३ कोटी लोकअमेरिकेत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ३ कोटींवर पोहोचली आहे. तिथे ३ कोटी ७० लाख कोरोना रुग्ण आहेत. तिथे आजवर ६ लाख ३५ हजार जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जगात २० कोटी ५६ लाख रुग्ण असून त्यातील १८ कोटी ४५ लाख जण बरे झाले.