Join us  

अजस्त्र टीबीएम उभारणार ठाणे-बोरीवलीचा बोगदा; चेन्नई, बंगळुरूमध्ये होणार टीबीएमची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 9:11 AM

या प्रकल्पात एकूण चार टीबीएम वापरल्या जाणार आहेत.

मुंबई :ठाणे-बोरीवली बोगद्यासाठी भारतातील सर्वांत मोठे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) वापरले जाणार आहे. त्यातील सर्वांत मोठ्या मशीनचा व्यास तब्बल १४ मीटर असेल. या प्रकल्पात एकूण चार टीबीएम वापरल्या जाणार आहेत. त्यातील पहिली टीबीएम मे २०२५ मध्ये मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईत सागरी किनारा मार्गासाठी आणि मेट्रो ३ प्रकल्पांत टीबीएमचा वापर करण्यात आला होता. यातील मावळा मशीन ही सर्वांत मोठी १२ मीटर व्यासाची होती. मात्र ठाणे बोरीवली मार्गासाठी याहून अधिक मोठी टीबीएम वापरली जाणार असून, तिचा व्यास १४ मीटर असेल. या प्रकल्पात दोन जुळे बोगदे उभारले जाणार आहेत. बोरीवली आणि ठाणे भागात दोन पॅकेजमध्ये या प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी चार टीबीएमच्या साहाय्याने दुहेरी बोगद्यांचे खोदकाम केले जाणार आहे. टीबीएमने खोदकाम पूर्ण केल्यानंतर या बोगद्याचा प्रत्यक्ष व्यास १३.०५ मीटर असेल. हे दुहेरी बोगदे प्रत्येक ३०० मीटर अंतरावर क्रॉस पॅसेजद्वारे जोडले जाणार आहेत.

दुहेरी बोगदे क्रॉस पॅसेजने जोडणार

दरम्यान, या टीबीएमचे बहुतांश पार्ट भारतात उत्पादित केले जाणार असून, चेन्नई आणि बंगळुरू येथे त्यांची उभारणी केली जाणार आहे. यातील पहिली मशीन मे २०२५ मध्ये मुंबईत दाखल होणार आहे. यानंतर भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होईल. तोपर्यंत या भुयारी मार्गाच्या कामासाठी टीबीएम उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम केले जाणार आहे. दरम्यान, टीबीएमने खोदकाम पूर्ण केल्यानंतर या बोगद्याचा प्रत्यक्ष व्यास १३.०५ मीटर असेल. हे दुहेरी बोगदे प्रत्येक ३०० मीटर अंतरावर क्रॉस पॅसेजद्वारे जोडले जाणार आहेत.

वैशिष्ट्ये काय? पारंपरिक खोदकाम पद्धतींपेक्षा पर्यावरणाची कमी हानी प्रगत नेव्हिगेशन आणि मॉनिटरिंग सिस्टम उत्खननाची अचूकता धूळ सप्रेशन सिस्टम्ससह आवाज कमी करणारे तंत्रज्ञान, स्वयंचलित प्रणाली आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा 

टॅग्स :मुंबईठाणे