मुंबईत भाषण...! उद्धव ठाकरे हिंदीत तर एम के स्टॅलिन ठामपणे तामिळ भाषेतच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 04:52 PM2023-09-01T16:52:16+5:302023-09-01T16:54:59+5:30
भयमुक्त भारतासाठी आम्ही सगळे एकत्रित आलोय. देशभरात अत्याचार होतोय पण सरकार काहीच करत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारवर केली.
मुंबई – इंडिया आघाडीची २ दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी २८ पक्षाचे ६५ नेते मुंबईत दाखल झाले होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. मुंबईत होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीचं नियोजन विशेषत: उद्धव ठाकरे गटाकडून केले गेले. या बैठकीत एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधले. ते म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हिंदीत भाषण केले तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी तामिळ भाषेत म्हणणं मांडले.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना मराठी भाषेत सर्व नेत्यांचे स्वागत केले. त्यानंतर हिंदी भाषेत पुढील भाषण केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडियाची तिसरी बैठक संपन्न झाली, दिवसेंदिवस इंडिया मजबूत होत चाललीय, जसजसं एक एक पाऊल पुढे सरकतोय तसं इंडिया विरोधी गटात भीती पसरली आहे. आमची देशभक्तीची आघाडी आहे. जे इंडियाचे विरोधक आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. आजच्या बैठकीत चांगले निर्णय झाले, समिती स्थापन झाल्या. हुकुमशाही, जुमलेबाजी, भ्रष्टाचाराविरोधात आम्ही लढाई लढू. मित्रपरिवाद वादासोबतही आम्ही लढणार आहोत. सबका साथ, सबका विकास हा निवडणुकीत नारा दिला गेला, परंतु ज्यांनी साथ दिली त्यांना लाथ मारली हे आम्ही पाहिले आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच भयमुक्त भारतासाठी आम्ही सगळे एकत्रित आलोय. देशभरात अत्याचार होतोय पण सरकार काहीच करत नाही. २०१४ मध्ये जी किंमत एलपीजी गॅसची होती ती वाढतच गेली, ५ वर्ष लूट आणि निवडणुकीवेळी सूट असं भाजपाचे धोरण आहे. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर एकमताने लढणार आहोत. आम्ही इंडियाला नक्कीच जिंकवू. ही लढाई आमची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांना शुभेच्छा आहेत असंही उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीसाठी हजर राहिलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्यांचे संपूर्ण भाषण तामिळ भाषेतच केले.
बैठकीत झालेले ठराव आदित्य ठाकरे यांनी मांडले, ते म्हणाले की, आम्ही लोकसभा निवडणुकीत सर्व जागा जिथे शक्य असतील तिथे एकत्रित लढू. जागावाटपाबाबत लवकरच चर्चा करू. इंडिया आघाडीच्या नेत्यांची रॅली देशभरात काढल्या जातील. त्याचसोबत जुडेगा भारत, जितेगा इंडिया या कॅम्पेनसाठी समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत इंग्रजी भाषेतून सर्वांना दिली.