मुंबई - राज्य आणि देशातील भाजपा सरकारविरुद्ध एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी तर देशात इंडिया आघाडीने रणशिंग फुंकले आहे. आगामी सर्वच निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढा देणार आहे. तर, देशपातळीवरील निवडणुकीत इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली असून देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे देण्यात आलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईतील नेहरु सेंटर येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा वज्रमूठ सभा होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार करण्यात आला.
इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक मुंबईतील एका हॉटेलमध्ये होत असून या बैठकीला देशातील सर्वच विरोधी पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येत आहेत. त्यामध्ये, ५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच, या बैठकीचे यजमानपद शिवसेनेला देण्यात आले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही नेतेही आमचे सहकारी असणार आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.