मुंबई : दारूमुळे सात प्रकारचे कर्करोग जन्माला येतात हे संशोधन आता जगमान्य झाले आहे. त्यामुळे भारताने सुधारित मद्यनीती ठरवण्याची गरज आहे. तरच, आरोग्य सेवेवरील ताण कमी होऊन देश सुदृढ होईल, असे मत डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या आरोग्य सेवेतील कार्याबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बंग यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र तसेच रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, हेमंत टकले उपस्थित होते. यावेळी पवार आणि गुजराथी यांनी बंग यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांनी मद्यनीती ठरवली असून, किमान ३३ टक्के मद्यविक्री कमी करण्यासाठी त्या देशांमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतातही आता मद्याच्या बाटलीवर ‘यामुळे कर्करोग होऊ शकतो’ असे छापायला हवे, असे डॉ. बंग म्हणाले.
गांधी बुक डेपोला रक्कम
यावेळी मिळालेला पुरस्कार आपण गडचिरोली जिल्हा आणि महात्मा गांधी यांना अर्पण करत आहोत, तर पुरस्कारापोटी मिळालेली रक्कम मुंबईतील गांधी बुक डेपो या गांधीजींचे विचार सर्वत्र पोहोचवणाऱ्या संस्थेला देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्टील सिटीचा गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जीवनावर परिणाम
गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिज आढळले आहे. हे लोहखनिज अत्यंत चांगल्या प्रतीचे असून या ठिकाणी एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा जिंदाल स्टील या कंपनीने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गडचिरोली आता स्टील सिटी असेल असे म्हटले आहे.
आमचा या प्रकल्पाला विरोध नाही मात्र यामुळे स्थानिक आदिवासींच्या जीवनावर मोठा दुष्परिणाम होणार आहे.
या प्रकल्पाचा स्थानिक आदिवासींना कसा फायदा होईल आणि जंगल कसे वाचवता येईल या दृष्टीने विचार करून निर्णय घ्यावा लागेल असेही डॉ. बंग म्हणाले.