इंडिया आघाडीच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेत घडले एकजुटीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:09 AM2024-03-18T10:09:47+5:302024-03-18T10:10:56+5:30
राहुल गांधींनी घेतले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इंडिया आघाडीच्या रविवारी झालेल्या शिवाजी पार्कवरील सभेत एकजुटीचे दर्शन घडले. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
कोण काय म्हणाले?
- तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख देशाचे भवितव्य, देशाचे आशास्थान असा केला.
- झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी हुकूमशाहीविरोधात महाराष्ट्र आणि झारखंड एकत्र उभे राहतील असे विधान केले.
- भाकपचे दीपांकर भट्टाचार्य यांनी बिहार आणि महाराष्ट्र हा लढा एकत्र मिळून लढतील असे सूतोवाच केले.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन
राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. क्रेनमधून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार घातला. तसेच, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेतले. यावेळी राहुल गांधींबरोबर प्रियंका गांधींही उपस्थित होत्या.
दोन कोटी रोजगाराचे काय झाले : तेजस्वी यादव
बेरोजगारी, महागाई, गरिबी हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. पण या शत्रूंवर चर्चा होत नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची चर्चा होत नाही. दोन कोटी रोजगाराचे काय झाले? १५ लाखांचे काय झाले? असा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा भाजपचे लोक आमच्यावर पलटवार करतात. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही घाबरणार नाही, असे राजदचे नेते तेजस्वी यादव म्हणाले. महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही डीलर आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.