मुंबईभारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विलीनीकरणातून एक देश निर्माण झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या भूमिकेचं स्वागतंच करेल, असं विधान राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.
'आम्ही 'अखंड भारत' या भूमिकेला मानणारे लोक आहोत. त्यामुळे कराची नक्कीच एक दिवस भारताचा भाग असेल', असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी नवं विधान करुन या चर्चेला वादाची फोडणी दिली आहे.
'कराची एक दिवस भारतात असेल असं विधान ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी केलं त्याच पद्धतीनं आम्हीही भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचं विलीनीकरण होऊन एक देश झाला पाहिजे असं म्हणत आहोत. बर्लिनची भिंत पाडली जाऊ शकते, तर मग भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र का येऊ शकत नाही? भाजप जर या तीन देशांचे विलीनीकरण करुन एक देश बनवू इच्छित असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील भाजपच्या भूमिकेचं स्वागतंच करेल', असं नवाब मलिक म्हणाले.
मुंबई मनपा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणारमुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी अशीच राष्ट्रवादी काँगेसचची इच्छा असल्याचं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं. 'मुंबई मनपा निवडणुकीसाठी आता फक्त १५ महिने शिल्लक आहेत. प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षासाठी काम करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक जण तसं कामही करत आहे. आम्हीही आमच्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्याचं सरकार समर्थपणे चालवत असणाऱ्या महाविकास आघाडीने मुंबई मनपा निवडणुका एकत्रितच लढवाव्यात अशी आमचीही इच्छा आहे', असं मलिक म्हणाले.
राज्यात लॉकडाउनची गरज नाहीराज्य सरकार पुन्हा लॉकडाउन करणार नाही, कारण सध्या तशी कोणतीही आवश्यकता नाही, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य अधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना याआधीच देण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यात सरकार यशस्वी झालं आहे. काही राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून त्यांनी काही बंधनं लादली आहेत. पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन केलं जाण्याची कोणतीही शक्यता नाही', असंही मलिक म्हणाले.