शिक्षक दिन : शिक्षकांचा आदर राखण्यात भारत आठव्या स्थानी; ३५ देशांचा सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 03:04 AM2019-09-05T03:04:34+5:302019-09-05T03:06:04+5:30
चीनमध्ये सगळ्यात जास्त शिक्षकांचा आदर केला जातो
सीमा महांगडे
मुंबई : शिक्षक म्हटले की समाजातील प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचे स्थान असणारी विशेष व्यक्ती आणि शिक्षकी व्यवसाय म्हणजे सन्मान आणि आदर असलेले क्षेत्र. ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स २०१८ च्या अहवालानुसार शिक्षकांना आदर देण्याच्या बाबतीत भारत आठव्या स्थानी आहे. तर चीन आणि मलेशिया हे देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असून शिक्षकी पेशाला डॉक्टरांच्या व्यवसायाइतकाच मान दिला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फिनलंड सारख्या देशांत या क्षेत्राला सामाजिक कार्याप्रमाणेच महत्त्व दिले जाते. जगातील ३५ देशांतील सामान्य नागरिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावली आणि त्यावर आधारित अहवालांवरून हे निष्कर्ष समोर आले आहेत.
समाजातील इतर व्यवसायांशी तुलना करताना शिक्षकी पेशाकडे कसे पहिले जाते ? या एका निर्देशकांचा वापर या अहवालासाठी करण्यात आला आहे. सोबतच शिक्षकांचा त्या त्या देशांतील पगार, पालक त्यांना या व्यवसायामध्ये येण्यासाठी किती प्रोत्साहित करता किंवा नाही या निर्देशकांचाही वापर या अहवालाच्या निष्कर्षांसाठी करण्यात आला आहे. २०१८ च्या ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स अहवालानुसार शिक्षकांविषयीचा समाजातील आदर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यांमध्ये सकारात्मक संबंध आहे. चीन आणि मलेशिया या देशांना अनुक्रमे १०० आणि ९३ गुण असून हे देश प्रथम आणि द्वितीय स्थानावर आहेत. तायवान रशिया आणि इंडोनेशिया हे देश पहिल्या पाचमध्ये तर अर्जेंटिना, घाना , इटली , इस्त्राईल आणि ब्राझील हे देश शेवटच्या पाच देशांत आहेत. बहुतांश देशांत शिक्षकी पेशाला समाज कार्याचा दर्जा दिला जात असल्याचे या अहवालांवरून समोर आले आहे. प्रत्येक देशामध्ये शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. यामुळे एकूण समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, आपल्या पाल्याला या व्यवसायामध्ये पाठविण्याची इच्छा, त्यांना समाजाकडून पुन्हा काय मिळते ? त्यांना एकूण वेतन काय मिळते ? या साºया गोष्टी अवलंबून असतात. अहवालानुसार बहुसंख्य देशांत शिक्षकांना आठवड्याला करावे लागणारे काम हे त्यांच्या व्यवसायिक तासांपेक्षा जास्त तास असते मात्र त्याच्या बदल्यात मिळणार मोबदला हा फारच कमी असल्याचे समोर आले आहे.
समाजावरील शिक्षकांचा प्रभाव कमी होतोय
एकूण ३५ देशात आठवा क्रमांक असणे हे कौतुकास्पद असले तरी खरे तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशात शिक्षकावर झालेला लाठीहल्ला यामुळे भारताचा क्रमांक शेवटचा असायला हवा. थेट गुरुपद द्यायचे व समाजाच्या निर्णयप्रक्रियेत स्थान नाही हा आपला समाज म्हणून दांभिकपणा आहे. राजकीय लोक शिक्षकांना मोजत नाहीत, पण तरीही शिक्षकांनी सामाजिक चळवळी, प्रबोधन यातील पूर्वी करीत असलेली समाजातील भूमिका मर्यादित करून घेतल्याने समाजावरील शिक्षकांचा प्रभाव कमी होत गेला. सेवा क्षेत्र व अधिकारी असण्याकडे नव्या पिढीचे आकर्षण वाढले त्याचाही परिणाम या क्षेत्राकडे न वळण्याकडे होतो आहे.
- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ