मुंबई : भविष्यात जगाची औषधांची राजधानी म्हणून भारताची ओळख निर्माण करायची असेल, तर भारतीय औषध निर्मिती उद्योग क्षेत्राला आपला ठसा उमटवावा लागेल. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे औषध निर्माते बनायचे की औषध निर्माते म्हणून प्रगत देशांमधील सर्वात वरचे स्थान गाठायचे, हे निश्चित करावे लागेल. यासाठी भारतीय औषधनिर्मिती उद्योगाने जगाचा मुख्य औषध पुरवठादार बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.
मुंबईत शुक्रवारी भारतीय औषध निर्माते संघटनेच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनांची स्पर्धात्मकता महत्त्वाची आहे. जगातील नव्या घडामोडी, उत्तम उत्पादन पद्धती याबाबतच्या अद्ययावत माहितीसोबत वाटचाल केली पाहिजे. भारत सरकार यासाठी पूरक मार्ग उपलब्ध करून देत आहे, असे ते म्हणाले. भारतामध्ये असलेल्या लहान उद्योगांना वर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेल्या भारतीय उत्पादक कंपन्यांनी मदतीचा हात दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यूएई आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय उत्पादनांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सरकारने मार्ग खुले केले आहेत. व्यापारी करारात पहिल्यांदाच अमूलाग्र निर्णयांचा समावेश केला आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात २०० हून अधिक देशांना औषध पुरवठाकोविड काळात २०० पेक्षा जास्त देशांना औषधांचा पुरवठा केला. औषध निर्मिती क्षेत्रामधील सामर्थ्याचे दर्शन घडवतानाच आपण एक संवेदनशील देश असल्याचेदेखील सिद्ध केले. गोयल यांनी सांगितले की, गेल्या अकरा वर्षांत पहिल्यांदाच देशाअंतर्गत पेटंटची नोंदणी जागतिक नोंदणीपेक्षा जास्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या सात-आठ वर्षांत पेटंटच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. काही औषधांच्या उत्पादनाचीदेखील भारतात पेटंट घेतली जात आहेत. या सर्वच बाबी अतिशय चांगल्या बदलाचे संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले.