चीनविरुद्ध लढाईसाठी भारताने सज्ज राहायला हवे- हेमंत महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 12:33 AM2020-11-10T00:33:44+5:302020-11-10T00:58:01+5:30
अमेरिकेत सत्तापालट
मुंबई : अमेरिकेत सत्तापालट झाला असला तरी देखील चीन त्यांच्या धोरणात बदल करणार नाही. उलट त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल. ट्रम्प यांच्या भांडखोर वृत्तीमुळे अमेरिकेचे युरोप सोबत संबंध बिघडले होते. परंतु बायडन हे परिपक्व राजकारणी असल्याने अमेरिकेचे युरोपशी बिघडलेले संबंध सुधारण्यास प्रारंभ होईल. त्यामुळे चीनविरुद्ध एकत्रित कारवाईला त्याचा उपयोग होईल.
भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरूच राहणार आहे. असे विधान लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख बिपीन रावत यांनी केले आहे ते योग्यच आहे. असे स्पष्ट करून चीन विरुद्ध दीर्घकालीन लढाईसाठी भारताने सज्ज राहायला हवे. असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. अमेरिकेतील सत्ताबदल युरोपमध्ये उग्रवाद तसेच दहशतवाद वाढण्यास कारणीभूत ठरेल का? तसेच चीनमधील अन्न संकट या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. तसेच कोरोनामुळे दिवाळीत फटाके न वाजविण्याचा निर्णय स्तुत्य आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहिलच शिवाय चीनच्या मालावर बहिष्कार असेल आणि ते आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. असे महाजन यांनी सांगितले.
मेहबूबा मुफ्ती यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी अनेक देश विघातक वक्तव्य केली ३७० कलम पुन्हा लागू करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई व्हायला हवी. कोणताही निषेध हा लोकशाही मार्गाने असावा. अन्यथा सामान्य जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतात. असे महाजन म्हणाले.