भारताने सुरक्षित अँप तयार करावे; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: July 21, 2023 07:36 PM2023-07-21T19:36:45+5:302023-07-21T19:37:23+5:30
परदेशी अँपच्या जागी भारतीय अँप्सचा विषयाचा सकारात्मक विचार करण्याची केली सभागृहाला सूचना
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुगल सर्च आज सामान्य झाले आहे. पण दुसरीकडे अशा अँपच्या वापरामुळे तरुणांना बिनधास्त, अमर्याद विषयांपर्यंत पोहोचण्याचा धोका आहे. यासोबतच डेटा सार्वभौमतेबाबतही देशाला विचार करावा लागेल. त्यामुळे नियम ३७७ अन्वये उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात अशा महत्त्वाच्या विषयावर काही सूचना केल्या. त्यांनी यासंदर्भात लोकमतला माहिती दिली.
गुगल सारख्या परदेशी अँप्समुळे अश्लील मजकूर प्रत्येक घराघरात बिनदिक्कत पोहोचतो आणि परिणामी आपल्या संस्कृतीवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीची मूल्ये घसरत आहेत. अँप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने डेटाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे तरुण पिढी अनैतिक क्रियाकलापांना बळी पडत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे गुगलसारख्या परदेशी अँपचाच्या पृष्ठभागावर भारताने स्वतःचा अँप का विकसित करू नये असा सवाल करत यामुळे आपल्या देशाच्या डेटा सार्वभौमत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सुरक्षित होईल, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या सूचनेद्वारे लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. सर्व परदेशी अँप्सवर बंदी घातल्यास इंटरनेट हल्ल्याचा धोका टाळता येईल. नियम ३७७ मध्ये राष्ट्रीय हिताची ही बाब मांडत परदेशी अँपच्या जागी भारतीय अँप्स तयार करण्याच्या सकारात्मक भूमिकेचा विचार करण्याची सूचना त्यांनी सभागृहाला केली.