मुंबई - भारतानेपाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवली. जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वायुसेनेचं कौतुक केलं आहे.
हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली गोष्ट झाली. अशाप्रकारचा कोणताही हल्ला भारत खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच भारत हा मजबूत देश आहे. मुंबईत नेहमी हाय अलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती घेत आहोत. सर्व यंत्रणांचे लक्ष आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे.
जाणून घ्या, दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्या ‘मिराज’बद्दल!
भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते. Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करुन त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले. ‘मिराज 2000’ लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमान मोठ्याप्रमावर वापर करण्यात आला होता. 'मिराज' विमानाची लाबी 47 फूट आहे. वजन जवळपास 7500 किलो इतके आहे. 2336 किमी प्रतितास स्पीड आहे. तर 125 राउंड गोळ्या प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. तसेच, 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला आणि अचूक लक्ष अचूक साधण्याची क्षमता या विमानामध्ये आहे.