लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑलिंपिकचे आयोजन करणे हे भारतीयांचे मोठे स्वप्न आहे. त्यामुळे या आयोजनासाठी भारत खूपच उत्सुक असून २०३६ सालच्या ऑलिंपिकच्या आयोजनासाठी दावा करेल आणि आयोजनाची जबाबदारी मिळाल्यानंतर ती यशस्वीरीत्या पारही पाडेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला.
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘जियो वर्ल्ड सेंटर’ इथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१व्या अधिवेशनाचे आयोजन १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योजक नीता अंबानी, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि पालकमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ४० वर्षांनंतर भारतात हे सत्र होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ऑलिंपिकचे आयोजन होणे हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. २०२९ साली होणाऱ्या यूथ ऑलिंपिकच्या आयोजनही भारत व्हावे, अशी आमची इच्छा आहे. वैदिक काळापासून भारताची परंपरा ही खेळाशी जोडली गेली आहे. ६४ विद्यांत पारंगत असण्याबाबत जे वेदांत सांगितले जाते त्या ६४ खेळांमध्ये पोहणे, घोडेस्वारी, नेमबाजी यासारख्या बहुतांशी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी भारत असा देश आहे की, तो ऑलिंपिक खेळांबरोबरच सर्वच क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीने ऑलिंपिकचे महत्त्व इथे किती आहे ही बाब अधाेरेखित करते, असे गौरवोद्गार काढले.
क्रिकेटमधील विजयाबाबत अभिनंदनअहमदाबाद येथील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये हिंदुस्थानने वर्ल्डकपमध्ये शानदार विजय मिळवला. याबद्दल मी भारतीय क्रिकेट टीम आणि सर्व भारतीयांना या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा देतो, असे सांगतानच त्यांनी मागील ऑलिंपिकमध्ये खेळाडूंनी बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख केला. एशियन गेम्समध्येही भारताच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.