आरोग्य सुविधांमध्ये भारत ‘व्हेंटिलेटर’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:49 AM2018-05-24T01:49:36+5:302018-05-24T01:49:36+5:30
लॅन्सेटचा अहवाल : चीन, बांगलादेश, श्रीलंका, भूतानपेक्षाही देशाची स्थिती वाईट
नवी दिल्ली : देशातील आरोग्य सुविधा अजुनही ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. या संदर्भात लॅन्सेट या संस्थेने केलेल्या १९५ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तब्बल १४५वा आहे. या यादीत बांगलादेश, श्रीलंका, भूतान या छोट्या शेजाऱ्यांनीही भारताला मागे टाकले आहे.
आरोग्यसेवांची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता याबाबतीत भारताला ४१.२ गुण देण्यात आले आहेत. १९९० मध्ये ते २४.७ इतकेच होते. जरी भारताच्या हेल्थकेअर अॅक्सेस अँड क्वालिटी निर्देशांकाने २००० ते २०१६ या काळात वेगाने झेप घेतली असली तरी सर्वांत चांगल्या आणि सर्वांत कमी गुणांमधील दरीही रूंदावल्याचे दिसून येते. सर्वात चांगल्या आणि सर्वात वाईट गुणांमध्ये १९९० साली २३.४ गुणांचा फरक होता तो २०१६ मध्ये ३०.८ इतका झाला आहे.
भारतापेक्षा चीन (४८ गुण), श्रीलंका (७१), बांगलादेश (१३३), भूतान (१३४) यांची स्थिती चांगली आहे तर नेपाळ (१४९), पाकिस्तान (१५४), अफगाणिस्तान (१९१) यांच्यापेक्षा भारताची स्थिती चांगली असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
आरोग्य सुविधांमध्ये हे देश मेरिटमध्ये
या आकडेवारीत पाच देशांची आरोग्यसुविधा व आरोग्यसुविधांचा प्रसार चांगल्या प्रकारे झाल्याचे दिसून येते. आईसलँड (९७.१ गुण), नॉर्वे (९६.६), नेदरलँड (९६.१) लक्झेंबर्ग (९६ गुण) हे पहिल्या चार क्रमांकांवर आहेत तर फिनलंड आणि आॅस्ट्रेलिया यांना प्रत्येकी ९५.५ गुण मिळाले आहेत.