India VS England : कोहली वि. अँडरसन, भारत-इंग्लंड मालिकेचा निर्णय निश्चित करेल ही लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 05:44 AM2021-02-05T05:44:19+5:302021-02-05T06:38:51+5:30
India VS England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत खेळवले जाणार आहेत.
चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत खेळवले जाणार आहेत. दरम्यान, या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. या दोघांमध्ये होणाऱ्या लढतीत जो कुणी बाजी मारेल. त्याचा संघ कसोटी मालिकेत वरचढ ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
घरच्या मैदानांवर इंग्लंडविरोधात विराट कोहलीची कामगिरीच खूप चांगली झालेली आहे. त्याने इंग्लंडविरोधात घरच्या मैदानांवर खेळताना नऊ कसोटी सामन्यांमध्ये ८४३ धावा फटकावल्या आहेत. त्यामध्ये त्याची सरासरी ही ७०.२५ एवढी राहिली आहे. यामध्ये त्याच्या ३ शतकांचाही समावेश आहे.
दुसरीकडे संथ आणि फिरकीला अनुकूल असलेल्या भारतीय खेळपट्ट्यांवर जेम्स अँडरसन हा तितकासा प्रभावी ठरणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी भारतात खेळलेल्या १० कसोटी सामन्यांत अँडरसनने २६ बळी टिपण्यात यश मिळवलेले आहे. ३८ वर्षीय अँडरसनचा हा अखेरचा भारत दौरा असू शकतो. त्यामुळे या दौऱ्यावर छाप पाडण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
विराट कोहली आणि जेम्स अँडरसनमध्ये कसोटीच्या मैदानात २०१२ पासून द्वंद्व सुरू आहे. २०१२ मध्ये झालेल्या लढतीत इंग्लंडने भारतात भारतीय संघाला २-१ ने मात दिली होती. तर २०१६ मध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघ मोठ्या फरकाने विजयी ठरला होता. तसेच त्या दौऱ्यात अँडरसनची कामगिरीही तितकीशी चांगली झाली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अँडरसनने जबरदस्त कामगिरी करत भारताला इशारा दिला होता.
सरलेल्या २०२० या वर्षाचा विचार केल्यास या वर्षात विराट कोहलीने केवळ तीन कसोटी सामने खेळले होते. यामध्ये त्याला केवळ एक अर्धशतकी खेळी करता आली होती. त्यामुळे आता मैदानात पुनरागमन केल्यावर अविस्मरणीय खेळी करण्याचा विराटचा प्रयत्न असेल.