Join us

भारत २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:24 AM

जागतिक स्वच्छतागृह परिषदेचा समारोप : वाईट सवयी रोखण्यासाठी दक्ष राहण्याची गरज

मुंबई : केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाने जागतिक स्वच्छतागृह दिनी भरविण्यात आलेल्या जागतिक स्वच्छतागृह परिषद २०१८चा समारोप नुकताच मुंबईत झाला. १९ व २० नोव्हेंबरला पार पडलेल्या या परिषदेत संपूर्ण देश २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यासाठी वाईट सवयी रोखण्यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याची गरजही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या परिषदेत उघड्यावर शौचास बसणे टाळण्यासाठी २०१९ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर साधकबाधक चर्चा झाली. या चर्चेत स्वच्छतेसाठी काम करणाºया सुमारे ३५०हून अधिक स्वयंउद्योजकांनी तत्त्वज्ञान व त्याचा वापर यावरही चर्चा केली. त्यात कार्पोरेट कंपन्यांसह शासकीय यंत्रणा, नागरी संस्था, तसेच सामाजिक संस्था यांचा समावेश होता. २००७ आणि २०१५ असे दोनदा या प्रकारची जागतिक परिषद भरली होती.

परिषदेत खासदार पूनम महाजन आणि अभिनेता अक्षय कुमार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. महाजन यांनी स्वच्छतेच्या महत्त्वाकडे सर्वांचे लक्ष वेधले. तर अक्षयने स्वच्छता मोहिमेची अधिक गरज असल्याने, त्याबाबतची जनजागृती होण्यासाठी अधिक लोकांसोबत विविध माध्यमांच्या आधारे काम करण्याचे आश्वासित केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या वर्षी मिळालेला हागणदारीमुक्त राज्याचा दर्जा पुढील वर्षीही कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला. या वेळी स्वच्छ भारत मिशनचे सचिव डॉ. परमेश्वरन अय्यर यांना स्वच्छतेच्या कामासाठी ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. या परिषदेत विविध चर्चासत्रे, तसेच विचारवंतांची, तज्ज्ञांची, बीजभाषणे झाली.धार्मिक संस्थांचा परिषदेत सहभागपण यंदाच्या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे, परमार्थ निकेतन आणि जिवा फाउंडेशन यांसारख्या धार्मिक संस्थांनीही परिषदेत सहभाग नोंदविला, शिवाय मुस्लीम नेते मौलाना मासूद आणि काही बुद्धिस्ट धर्मगुरूंनीही या वेळी उपस्थिती दर्शविली. परिषदेत सर्वच नेतेगण आणि प्रतिनिधींनी काळाची पावले ओळखून उद्दिष्टाप्रती आगेकूच करण्यासाठी आश्वस्त केले.