मुंबई : जपान मुंबईला दोन शिंकानसेन ट्रेन (बुलेट ट्रेन) भेट स्वरुपात देणार आहे. त्यांचा वापर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या निरीक्षणासाठी केला जाणार आहे. इ५, इ६ या मॉडेलच्या या दोन ट्रेन भारतात २०२६ पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच भारतातील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे.
३२० किमी प्रति तास वेग असलेल्या या दोन ट्रेनमुळे भारतीय अभियंत्यांना शिंकानसेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत होणार आहे. २०३० च्या सुरुवातीला मुंबई-अहमदाबाददरम्यान इ१० शिंकानसेन ट्रेन चालविण्याचा भारत व जपानचा विचार आहे.
या रेल्वेमार्गाचा सूरत ते बिलीमोरा यादरम्यानचा पहिला टप्पा ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. तो ४८ किमीचा आहे. उर्वरित भाग सर्व काम पूर्ण झाल्यानंतर सुरू केला जाईल, असे जपान टाइम्स या वृत्तपत्रातील बातमीत म्हटले आहे.
सूरत ते बिलीमोरादरम्यान स्टील मास्ट
गुजरातमध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) मास्ट लावण्याचे कामही सुरू आहे. हे मास्ट विद्युततारा धरून ठेवतात. सूरत आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्टेशनदरम्यान २ किलोमीटरपर्यंत स्टीलचे मास्ट लावले गेले आहेत.
या नद्यांवर रेल्वेपूल
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर १४ नद्यांवर पूल बांधले गेले आहेत. यात पार (वलसाड जिल्हा), पूर्णा, मिंधोला, अंबिका, वेंगनिया, कावेरी आणि खारेरा (सर्व नवसारी जिल्ह्यात), औरंगा आणि कोलक (वलसाड), मोहर आणि मेशवा (खेडा), धाधर (वडोदरा), वत्रक (खेड़ा) आणि किम (सूरत) नद्यांचा समावेश आहे. ७ स्टीलचे पूल आणि ५ प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पूलही बांधले गेले आहेत. बुलेट ट्रेनच्या २९२ किमीपर्यंत पूल बांधण्याचे काम झाले आहे.
महाराष्ट्रात का उशीर?
गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. मुंबई परिसरात बोगदे बांधण्याचे काम किमान पाच वर्षे सुरू राहणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात बुलेट ट्रेन २०३० नंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. ३७४ किमीपर्यंत खांबाचे काम, ३९३ किमीपर्यंत खांबांची उभारणी, ३२२० किमीपर्यंत गर्डर कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर हा पुलाचा एक महत्त्वाचा भाग असतो.